चीन कथांनुसार, पहिल्या मानवी वसाहती नद्या, तलाव, पाणथळ जागा आणि समुद्र या जलाशयांच्या परिसरात भरभराटीला आल्या. शिकारीसाठी भटकंती करताना, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची आवश्यकता होती. नदी किनार्यालगतची जमीनदेखील सर्वात सुपीक होती. जिथे तिचे पोषण पाण्याच्या स्रोताद्वारे सहजपणे करता येत असे. परिणामी, मानवांनी जमीन आणि समुद्राच्या छेदनबिंदूवर वस्त्या स्थापन केल्या. हीच प्राचीन संकल्पना समोर ठेवून, आज तरंगणारी शहरे काळाची गरज बनत आहेत.
मालदीवमध्ये सुमारे ८० टक्के जमीन समुद्रसपाटीपासून एक मीटरपेक्षा कमी उंचीवर आहे आणि समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे त्यांना आधीच आव्हानांचा सामना करावा लागत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे येत्या काही दशकांत समुद्राची पातळी वाढणे, हे एक मोठे आव्हान बनेल. केवळ मालदीवसारख्या बेट राज्यांसाठीच नाही, तर मियामी, शांघाय आणि बँकॉकसारख्या महानगरांसाठीदेखील हे आव्हान असेल. नॉर्वेसारख्या वाढत्या समुद्रसपाटीपासून कमी प्रभावित झालेल्या प्रदेशांमध्ये जागेचा अभावदेखील एक आव्हान असू शकते. किनार्यावरील भूखंड गृहनिर्माणासाठी आकर्षक आहे. त्यामुळे अशा भूखंडांच्या किमती वाढत आहेत.
१९६० सालच्या दशकात, बकमिन्स्टर फुलरच्या ट्रायटन सिटी आणि केन्झो टँगेच्या टोकियो बे प्लॅनसह समुद्रातील पाण्यावर तरंगणार्या शहरांची कल्पना उदयास आली. हे प्रकल्प जल वास्तुकलेच्या कल्पनांवर विकसित झाले. ज्यामध्ये आधुनिक सुविधा, नेटवर्क आणि व्यवस्थित वाढ करणे प्रस्तावित होते. या वास्तुकलेमध्ये स्टिल्ट हाऊससारखे टेक्टोनिक्स, पोकळ प्लास्टिक घटकांपासून बनवलेल्या चौकटींचा समावेश होता. तर आधुनिक युगात, आदर्शवादी संरचनांमध्ये स्टीलपासून बनवलेल्या संरचनांचा समावेश होता आणि इमारती तरंगत ठेवण्याच्या नवीन पद्धतींचा शोध लावण्यात आला. २१व्या शतकात, वास्तुविशारद आणि नागरिकही या नव्या शहरांची कल्पना अधिक गांभीर्याने घेऊ लागले आहे.
मालदीव फ्लोटिंग सिटी हादेखील एका नव्या युगाचा आरंभ आहे. ज्यामध्ये मालदीवचे लोक पर्यावरणपूरक फ्लोटिंग प्रकल्पांसह पाण्यात वास्तव्य करू शकतात. या शहरात रस्ते आणि कालव्यांची नसैर्गिक रचना आहे. डच डॉकलॅण्ड्स, मालदीव सरकारसोबत संयुक्त उपक्रमात या शहराचा विकास करत आहे. एनएल यांनी या प्रकल्पासाठी मास्टरप्लॅन आर्किटेक्ट म्हणून भूमिका बजावली आहे. ही नेदरलॅण्ड्समधील एक आर्किटेक्चरल फर्म आहे, जे शहरीकरण आणि हवामान बदलामुळे निर्माण होणार्या समस्यांवर उपाय शोधत नवे पर्याय निर्माण करण्यावर भर देतात. भविष्यातील विकासाची अनपेक्षित गरज लक्षात घेऊन, आज धोरणे आखणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर मालदीवमधील लगून हे शहर, राजधानी माले आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे. लगून या २०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात हजारो गृहनिर्माण युनिट्स, हॉटेल्स, दुकाने, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक केंद्र उभारण्यात येतील.
जगभरात अनेक ठिकाणी तरंगणारी घरे आढळतात. पेरूमधील टिटिकाका सरोवरातील तरंगते उरोस बेटे, कंबोडियातील तरंगते गावे आणि युकेमधील तरंगती घरे ही काही उदाहरणे आहेत. नेदरलॅण्ड्सला तरंगते घरे बनवण्याचा दीर्घ अनुभव आहे. अलीकडेच नेदरलॅण्ड मोठ्या तरंगत्या इमारतींकडे वळले आहे. २०२१ साली, ‘फ्लोटिंग ऑफिस रॉटरडॅम’ ही एक तीन मजली तरंगती व्यावसायिक इमारत उभारली. ती तरंगत्या काँक्रीटच्या पायावर लाकडापासून बांधण्यात आली. सिंगापूर आणि दक्षिण कोरियातील बुसान ही इतर उदाहरणे आहेत. येथेही खूप लोक आहेत, जमीन कमी आहे आणि पाणी तुलनेने शांत आहे. सिंगापूरमध्ये, सिंटेफ बंदराचा विस्तार करण्यासाठी डिझाईन केलेल्या तरंगत्या युनिट्सचा यात समावेश आहे.
या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी सागरी तंत्रज्ञानाची आव्हाने आहेतच. जर तुम्ही तरंगते शहर बांधणार असाल, तर तुम्हाला इतर अनेक कौशल्यांचीदेखील विचार करावा लागेल. याच्या विकासासाठी अभियंते, वास्तुविशारद, शहरी नियोजक, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि इतर अनेक तज्ज्ञांची आवश्यकता असेल. आजमितीला याची सर्वाधिक कौशल्य जगभरात नॉर्वेकडेच आहेतच.