वाल्मिक कराडचा मुलगाही अडचणीत! सुशील कराडवर गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
11-Jan-2025
Total Views |
बीड : (Walmik Karad) बीड मस्साजोगच्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड हे नाव गेला महिनाभर राज्यात चर्चेत आहे. मात्र वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड (Sushil Karad) देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याच्या सूचना न्यायलयाने द्याव्यात अशी अर्जाद्वारे मागणी केली आहे. ऑगस्ट महिन्यात सोलापूर न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी सुनावणी सुरु आहे, मात्र न्यायालयाने अद्याप एफआयआर दाखल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही. सुशील कराड याने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सुशील वाल्मिक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये दाद मागितली आहे. १३ जानेवारी रोजी यासंदर्भात सुनावणी होणार आहे, त्यामुळे आता सुशील कराडवर करण्यात आलेल्या आरोपाबाबत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.