'आप'च्या मद्द घोटाळ्यामुळे २,०२६ कोटी रूपयांचे नुकसान!
CAGच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर
11-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहालचा घोटाळा समोर आल्यानंतर, अनेक धक्कादायक गोष्टींचे खुलासे समोर येत आहेत. कॅगच्या अहवालानुसार दिल्ली सरकारच्या कथित मद्द घोटाळ्यामुळे सरकारच्या २ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले. या मद्द घोटाळ्यामुळे आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरूंगवास भोगावा लागला. खुद्द अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. सदर धोरण ज्यावेळेस न्यायालयीन अडचणींमध्ये सापडले, त्यावेळेस रद्द करण्यात आले.
कॅगने सादर केलेल्या अहवालानुसार या मद्द धोरणामुळे आम आदमी पक्षाच्या नेत्यांचा फायदा झाला. कोवीडच्या काळात केजरीवाल यांच्या सरकारने परवाना शुल्क रद्द केले ज्याची किंमत १४४ कोटी रूपये होती. आम आदमी पक्षाच्या सरकारने विभागीय परवाने वाटपात घोटाळा केला ज्यामुळे ९४१ कोटी रूपयांचा तोटा झाला. काही किरकोळ विक्रेत्यांनी पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी आपले परवाने परत केले, परंतु सरकारने त्यांची निविदा पुन्हा काढली नाही, ज्यामुळे ८९० कोटी रुपयांचे नुकसान झाले. सुरक्षा ठेवींच्या चुकीच्या संकलनामुळे २७ कोटी रूपयांचे नुकसान झाले. त्याच बरोबर परवाना वाटपादरम्यान दिल्लीच्या सरकारने पारदर्शकता दाखवली नसल्याचे सुद्धा अहवालात नमूद केले आहे.
दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षांची भूमिका बजावणारे भाजप आणि काँग्रेस यांनी सातत्याने केजरीवालांवर निशाणा साधत या घोटाळ्याची चौकशी व्हावी यासाठी मागणी केली होती. अखेर कॅगच्या अहवालात या बद्दलचे वास्तव जनतेच्या समोर आले आहे.