'आप'दा-ए-आजम' व्हिडीओ शेअर करत भाजपने साधला केजरीवालांवर निशाणा!
11-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. विविध पक्ष प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. अशातच केजरीवालांच्या आलिशान शीशमहालवरून भारतीय जनता पक्षाने त्यांना लक्ष्य केले आहे. भाजपने आपल्या अधिकृत X हँडल वरून व्हिडीओ आणि पोस्टर शेअर करत केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला चांगलाच दणका दिला आहे.
भाजपचे दिल्लीचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत शीशमहाल - आपदा फैलाने वालों का अड्डा हे गाणं आणि आपदा ए आजम हे पोस्टर शेअर केले. अलिकडच्या काळात अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना ज्या निवासस्थानी राहायचे, तो त्यांचा बंगला चर्चेचा विषय झाला आहे. कॅगच्या अहवालानुसार केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले होते. निवडणूकीतील प्रचाराच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाचा उल्लेख 'आपदा' असा केला होता. विरेंद्र सचदेव माध्यमांशी बोलताना म्हणाले की " बदल घडवण्यासाठी जे केजरीवाल सत्तेत आले त्यांनी स्वत:चे चारित्र्यच बदलले. दिल्लीच्या लोकांना परिवर्तनाची अपेक्षा होती, दिल्लीचे नागरिक आता याबद्दलच केजरीवाल यांना प्रश्न विचारत असताना, केजरीवाल मात्र त्या नागरिकांना शिवी गाळ करत आहेत. येत्या ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या विधानसभेसाठी मतदान होईल, तर ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होईल. प्रामुख्याने आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप असा सामना दिल्ली विधानसभेसाठी रंगणार असल्याचे बोलले जात आहे.