नावीन्यपूर्ण प्रयोग केला नाही तर राजकारणात टिकणार कसे?

उबाठा गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया

    11-Jan-2025
Total Views |
 
Uday Samant
 
मुंबई : उबाठा गटाने नावीन्यपूर्ण प्रयोग केला नाही तर राजकारणात टिकणार कसे? अशी प्रतिक्रिया उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत उबाठा गटाने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
मंत्री उदय सामंत म्हणाले की, "यामध्ये काही नावीन्यपूर्ण आहे असे मला वाटत नाही. लोकसभेला फेक नरेटिव्ह सेट करून आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. पण विधानसभेला देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली तो फुगा आम्ही फोडला. आता खरी कसोटी आहे. उबाठा स्वतंत्र लढत असताना मुस्लीम बांधव आणि भगिनी त्यांना मतदान करणार का? हा एक मोठा प्रश्न आहे. काँग्रेसला वाटते की, ती वोटबँक आमची आहे आणि उबाठालाही ती वोटबँक आमची आहे, असे वाटते. त्यामुळे महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षांची आता कसोटी आहे."
 
हे वाचलंत का? -  जन्म दाखला घोटाळ्याची पाळेमुळे अमरावतीतील अंजनगाव सुर्जी तालुक्यापर्यंत!
 
"त्यांच्यात काय चालले आहे, हे जसे तुम्हाला कळत नाही, तसेच ते महाराष्ट्रातील मतदारांनासुद्धा कळत नाही. २०१९ ला जनमत मिळाले असताना काँग्रेससोबत जाणे. त्यानंतर काँग्रेसच्या हाताच प्रचार करणे. भविष्यात शिवसेनेकडून हाताचा प्रचार कधीही होऊ शकत नाही, असे वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते. त्या काँग्रेसचा प्रचार करणे. भाषणात हिंदूह्दयसम्राट हा शब्दप्रयोग न करणे, या सगळ्याचे फटके बसले असतील. म्हणून कदाचित हा निर्णय त्यांनी घेतला असेल," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "पक्ष टिकवायचा असेल आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करायचा असेल, तर नावीन्यपूर्ण प्रयोग करणे त्यांचा प्राधान्यक्रम आहे. हे नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी केले नाही तर राजकारणात टिकणार कसे? त्यांची काल-परवाची भूमिका आणि आजची भूमिका यातून त्यांच्यात प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचा नेता जनतेसमोर गेला, तर तोसुद्धा राजकारणात विक्रमी घडामोडी करु शकतो, हे एकनाथ शिंदे साहेबांनी शक्य करून दाखवले. त्यामुळे राजकारणात कधीही कोणाला कमी लेखू नये," असेही मंत्री उदय सामंत म्हणाले.