'अंदाज अपना अपना' फेम अभिनेते टिकू तलसानिया यांना ह्रदयविकाराचा झटका
11-Jan-2025
Total Views |
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. टिकू यांनी आजवर अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या असून कभी हा कभी ना, इश्क अशा अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांना झटका आला असून सध्या त्यांच्यावर कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
टिकू यांनी आजवर विनोदी भूमिका अधिक साकारल्या आहेत. १९५४ साली जन्मलेल्या टिकू यांनी १९८४ साली अभिनयाची कारकिर्द सुरु केली. १९८६ साली प्रदर्शित झालेल्या प्यार के दो पल या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर हम है राही प्यार के, अंदाज अपना अपना, राजा हिंदुस्थानी, हंगामा, धमाल अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.