नागपूर : महाविकास आघाडी एकत्र लढणार की, वेगळी लढणार याकडे आमचे लक्ष नसून महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शनिवार, ११ जानेवारी रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका उबाठा गटाने स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाविकास आघाडी एकत्र लढणार, वेगळे लढणार, राहणार की, तुटणार याकडे आमचे लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या सगळ्या निवडणूकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे वाचलंत का? - ब्रेकिंग! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची गती वाढवावी!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची पाहणी केली. ते म्हणाले की, "नागपूरमधील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालये अत्यंत जुनी आहेत. जीएमसी तर एकेकाळी आशियातील सर्वात मोठे मेडिकल कॉलेज म्हणून गणले जात होते. त्यामुळे मागच्या काळात याचा एक मास्टरप्लान तयार करून १ हजार कोटी रुपये देऊन अद्ययावत व्यवस्था तयार होण्यासंदर्भात काम सुरु केले होते. या कामाची प्रगती पाहण्यासाठी मी आलो होतो. दोन्ही ठिकाणी कामे सुरु असून ती प्रगतीपथावर आहेत. पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यातील छोट्यामोठ्या त्रृटी दूर करण्याची आवश्यकता आहे. यात निधीची कमतरता येणार नसून ही सगळी कामे वेळेत आणि उत्तम दर्जाची व्हावी. ही दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये एखाद्या चांगल्या खाजगी रुग्णायलापेक्षा किंवा मेडिकल कॉलेजपेक्षा चांगल्या दर्जाची बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कामाची गती वाढवण्याच्या सूचना मी दिल्या असून एप्रिल महिन्यात पुन्हा इथे भेट देणार आहे," असे त्यांनी सांगितले.
ते रिकामटेकडे आहेत मी नाही!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत असे विधान केले होते. यावर संजय राऊतांनी टीका केली. त्यानंतर फडणवीसांनी यावरून त्यांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले की, "त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. मी माझे मत व्यक्त केले. त्यांच्या बोलण्यावर मत व्यक्त करायला मी बांधिल नाही. ते रिकामटेकडे आहेत. रोज बोलतात. मी रिकामटेकडा थोडीच आहे," असे ते म्हणाले.