शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या
11-Jan-2025
Total Views |
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो हॉस्पिटल) तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, (जीएमसी) नागपूर यांची पाहणी केली.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (आयजीएमसी) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) नागपूर ही दोन्ही महाविद्यालये अतिशय जुनी आहेत. जीएमसी, नागपूर हे एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालय म्हणून गणले जात असत. दोन्ही महाविद्यालयांच्या इमारती या अतिशय पुरातन स्वरूपाच्या आहेत. या दोन्ही ठिकाणी सर्व प्रकारच्या अद्यावत सुविधा मिळाव्यात म्हणून, राज्य शासनाने १ हाजार कोटींची तरतूद करून, येथे कामाला सुरुवात केली असल्याचे, मुख्यमंत्री यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही महाविद्यालयात प्रगतीपथावर असलेल्या कामांचा यावेळी सखोल आढावा घेतला. सर्व प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी तसेच कामांमधील किरकोळ त्रुटी दूर करून, कामांची गती वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी संबंधितांना दिले.
🔸CM Devendra Fadnavis at the Government Medical College, Nagpur 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे उपस्थित 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारी मेडिकल कॉलेज, नागपुर में उपस्थित
मेयो आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) येथील प्रगतिपथावरील कामे, सद्यस्थिती, अडी-अडचणी, कामाची गुणवत्ता यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम स्थापन करण्याचेही निर्देश जिल्हाधिकार्यांना यावेळी मुख्यमंत्री यांनी दिले. तसेच दोन्ही महाविद्यालय आणि रुग्णालयाला लागणार्या वीजेची गरज, ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागविली पाहिजे व संपूर्ण कॅम्पस परिसर देखील सौर ऊर्जेवर असावा, यासंदर्भातही निर्देश, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
या दोनही ठिकाणी सध्याची प्रस्तावित कामे पूर्ण केल्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत, तसेच या दोन्ही संस्थांच्या परिसरात अधिकाधिक झाडे लावण्यावर भर देण्यात यावा, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. कामांच्या गुणवत्तेत तडजोड होणार नाही, याची खात्री करण्याचे आदेश ही त्यांनी दिले. दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, तसेच येत्या एप्रिल महिन्यात या कामांचा फेरआढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.