'आप'चे नेते महेंद्र गोयल यांचा बांगलादेशी घुसखोरांशी संबंध
पोलीस प्रशासनाने बजावली नोटीस
11-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच आता दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे आमदार महेंद्र गोयल यांच्याविरोधात नोटीस जारी केली असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याची माहिती सांगण्यात आली. अवैध बांगलादेशी नागरिकांच्या कागदपत्रांशी संबंधित प्रकरण असून आमदार महेंद्र गोयल यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या एका माहितीनुसार, बांगलादेशी नागरिकांकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या तपासामध्ये त्यांचे नाव समोर आले आहे. याप्रकरणी आता तातडीने कारवाई करत पोलिसांनी महेंद्र गोयल यांना ११ जानेवारी २०२५ रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी अलीकडेच अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष कारवाई सुरू केली होती, ज्यात अनेक बांगलादेशी नागरिकांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या नागरिकांचे कागदपत्र जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणात आता गोयल यांचे नाव समोर आले आहे.
दिल्ली पोलिस अवैध बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहिम राबवत आहेत. याप्रकरणात ५०० हून अधिक अवैध बांगलादेसी घुसखोरांची ओळख पटली असून त्यापैकी अनेकांना बांगलादेशात परत पाठवण्यात आले आहे.