कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ७० नव्हे तर ९० तास काम करायला हवे -एस एन सुब्रमण्यम
नारायण मुर्ती यांचीच री ओढणारे वादग्रस्त विधान
10-Jan-2025
Total Views |
मुंबई : " मला वाईट वाटते की माझे कर्मचारी जेव्हा रविवारीसुध्दा काम करत नाहीत. जर त्यांनी आठवड्याला ९० तास काम केले तर मला खूप आनंद होईल." असे विधान एलएनटीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम यांनी केले आहे. ते कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. सध्या सोशल मिडियावर त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. याआधी इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायणमुर्ती यांनी याआधी तरुणांनी आठवड्याला ७० तास काम करायला असे विधान केले होते.
नेमकं काय म्हणाले सुब्रमण्यम ?
या व्हिडिओमध्ये सुब्रमण्यम म्हणत आहेत की, मला खुप वाईट वाटते जेव्हा मी माझ्या कर्मचाऱ्यांना रविवारीसुध्दा कामाला बोलावू शकत नाही. जर मला त्यांना रविवारी पण कामाला लावता आले तर मला खूप आनंद होईल. घरी बसून तुम्ही तुमच्या बायकोच्या चेहऱ्याकडे किती वेळ बघत बसणार आहात ? चला ऑफिसला जाऊन काम करुया. मी स्वत: रविवारी काम करतो.
नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड
सुब्रमण्यम यांच्या या विधानावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. एका एलएनटी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने म्हटले आहे की, हा माणूस तर नारायणमूर्ती पेक्षाही वर निघाला, ते तरी फक्त ७० तासच काम करा सांगत होते. एका नेटकऱ्याने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की सीइओ पदावरच्या माणसांना पगार, सोई -सुविधा सगळंच जास्त मिळतं, तर ते एवढ्या कामाची अपेक्षा कायम कमी पगारावर काम करणाऱ्या छोट्या कर्मचाऱ्यांकडूनच का करत असतात ? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले आहेत.
एकुणच यानिमित्ताने कर्मचारी त्यांना मिळणारे पगार, त्यांचे कामाचे तास, वर्क -लाइफ बॅलन्स या सगळ्याच गोष्टी पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत.