बघ्यांच्या गर्दीत शुभदा जीवानिशी गेली, थरकाप उडवणारा हत्येचा व्हिडीओ व्हायरल!

    10-Jan-2025
Total Views |
 
shubhada kedare
 
पुणे : (Shubhada Kedare Case) पुणे शहरामध्ये भर दिवसा कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या शुभदा केदारे (वय २८ ) हिच्यावर कोयत्याने हल्ला करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दि. ७ जानेवारी रोजी घडला. त्यानंतर गुरुवारी या घडल्या प्रकाराचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमध्ये आसपास ४० ते ५० माणसांची वर्दळ असतानाही आरोपीने तरुणीवर हल्ला केला. गर्दीतले लोक या घटनेत बघ्याची भूमिका घेताना दिसतात. आरोपी शुभदावर वार करत असताना तिच्या मदतीला कोणीही पुढे सरसावले नसल्याचे या व्हिडीओतून समोर आले आहे.
 
नेमकं काय घडलं? 
 
आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजिया (वय ३०, रा. खैरेवाडी, कात्रज, पुणे) आणि मृत शुभदा केदारे (वय २८ ) हे दोघेही २०२२ सालापासून डब्लू.एन.एस. कंपनीत एकत्र काम करत होते. तेव्हा त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. पुढे त्यांची मैत्री झाली. आरोपी कृष्णाने दिलेल्या माहितीनुसार, शुभदा हिने वडील आजारपणाचे कारण सांगून उपचारांसाठी त्याच्याकडून चार लाख रुपये घेतले होते. मात्र, दिवसेंदिवस तिची पैशांची मागणी वाढत चालली होती. त्यामुळे कृष्णाला संशय आला. त्याने अडीच-तीन महिन्यांपूर्वी शुभदा हिचे कराड (जि. सातारा) येथील घरी जाऊन तिच्या वडिलांकडे यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी शुभदाने आपल्याकडून घेतलेले पैसे वडिलांच्या वैद्यकीय उपचारासाठी वापरले नसल्याचे त्याच्या लक्षात आले. कृष्णाचीही परिस्थिती जेमतेमच असल्याने आपण कष्टाने कमावलेले पैसे तिने खोटे बोलून आपल्याकडून घेतले, याचा राग त्याच्या डोक्यात बसला होता. त्या रागातूनच कृष्णाने कोयत्याने वार करीत तिचा खून केल्याचे स्पष्ट केले
 
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी कृष्णा याने स्वतःसोबत आणलेल्या कोयत्याने शुभदाच्या हातावर वार केले. यावेळी मोठ्या संख्येने तिच्या कार्यालयातील सहकारीवर्ग, ड्रायव्हर तिथे उपस्थित होते. यावेळी आरोपी हल्ला करुन झाल्यावर बिंधास्त तिच्या जवळपास वावरत फिरत आहे, तिच्यावर धारदार शस्त्राने वार करत आहे. मात्र तरीही लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. जर त्यावेळी लोकांनी प्रसंगावधान दाखवून आरोपीविरोधात ठोस पावले उचलली असती, तर कदाचित शुभदाचा जीव वाचला असता, असे म्हटले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे.