मुंबई : भारतीय शेअर बाजाराने आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही सावरण्याचं नावच घेतलं नाही. २४१ अंशांची घसरण होत सेन्सेक्स ७७, ३७८ अंशांवर बंद झाला. निफ्टीही या घसरणी पासुन वाचू शकला नाही. ९५ अंशांची घसरण होत, निफ्टी २३, ४३१ अंशांवर बंद झाला. दिवसभर विक्रीचा जोर कायम राहील्यामुळे ही घसरण दिसून आली आहे.
शुक्रवारी स्मॉलकॅप, मिडकॅप इंडेक्स मध्ये घसरण झाली. इंडसइंड बँक, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, सनफार्मा, एसबीआय यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसुन आली. त्याचबरोबर ८७ असे शेअर्स राहीले ज्यांच्या किंमतीत कुठलाच बदल झाला नाही. याउलट टीसीएल, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
नुकत्याच संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली राहिली असल्याने, प्रामुख्याने आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तरीसुध्दा खनिज तेलाच्या वाढत्या किंमती, जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून दिले गेलेले कठोर आर्थिक नितीचे संकेत दिले गेले असल्याने बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्याचेच पडसाद या घसरणीच्या रुपाने दिसत आहेत असे तज्ज्ञांचे मत आहे.