नवी दिल्ली : (Sambhal Case) संभल येथील जामा मशिदीच्या व्यवस्थापन समितीने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली आणि मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एका खाजगी विहिरीच्या संदर्भात यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने न्यायालयाच्या परवानगीशिवाय विहिरीबाबत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी अधिकाऱ्यांना दोन आठवड्यात स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सरन्यायाधीश म्हणाले, अशा कोणत्याही कृतीला परवानगी दिली जाणार नाही. कृपया स्थिती अहवाल सादर करा. विहिरीबाबत यथास्थिती कायम ठेवावी आणि त्यासंबंधीची कोणतीही सूचना प्रभावी ठरणार नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.
हिंदू पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, विहीर मशिदीच्या आवाराबाहेर आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या ती पूजेसाठी वापरली जात आहे. मुस्लिम पक्षाचे वकील अहमदी म्हणाले की, विहीर काही प्रमाणात मशिदीच्या परिसरात आहे आणि काही प्रमाणात बाहेर आहे. त्याने आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ गुगल मॅप्सवरील एका चित्राचा उल्लेख केला.