फतव्यांच्या कक्षेत...

    10-Jan-2025   
Total Views |
Marium Nawaz

पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी युएईचे राष्ट्रप्रमुख शेख मोहम्मद बिन जायद यांच्याशी नुकतेच हस्तांदोलन केले. पण, परपुरुषाशी हस्तांदोलन करून मरियमने ‘शरिया’ कायद्याचे उल्लंघन केले आहे, म्हणत पाकिस्तानी उलेमांनी, मुल्ला-मौलवींनी मरियम विरोधात फतवा काढावा, यासाठी तेथील कट्टर मुस्लीम नागरिक आणि राजकारणीदेखील आग्रही आहेत. या हस्तांदोलनावरून पाकिस्तानमध्ये वातावरण तापले. पाकिस्तान वेगळा झालाच, तोच मुळी मुसलमान राष्ट्र व्हावे म्हणून! पाकिस्तान स्वत:ला इस्लामचा कट्टर देश मानतो. त्यामुळे मरियम मुख्यमंत्री असली म्हणून काय झाले, आहेत तर ती स्त्रीच! तर स्त्री असलेल्या मरियमने युएईच्या राष्ट्रपतींच्या हाताला स्पर्श करणे म्हणजे भयंकर पाप!

असो. पाकिस्तानमध्ये स्त्री असलेल्या मरियमविरोधात वातावरण एकाएकी तापले. मात्र, त्याचवेळी मरियमने ज्यांच्या हाताला स्पर्श केला, त्या युएईच्या राष्ट्रप्रमुखांना मात्र पायघड्या घालण्यात आल्या. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानने एक कलमी कार्यक्रम राबविला. तसे युएईचे राष्ट्रप्रमुख दरवर्षी पाकिस्तानच्या दौर्‍यावर आठवड्याभरासाठी येतात. कोणत्या कामासाठी येतात? तर कामासाठी नाही ते चैनीसाठी येतात. जगभरात वन्यजीव मुक्याप्राण्यांच्या शिकारीला बंदी आहे. मात्र, जायद यांना शिकारीची हौस. ही हौस कुठे भागणार? तर, श्रीमंत राष्ट्रांपुढे भिकेचा कटोरा घेऊन उभा राहणारा पाकिस्तानच युएईच्या राष्ट्रमुखांची हौस भागवू शकतो. पाकिस्तानने युएईच्या शेखांची मर्जी राखण्यासाठी त्यांना पाकिस्तानमध्ये शिकार करण्यासाठी परवानगी दिली. अर्थात, ती फुकट नाहीच. भिकेची सवय आणि हौस पाकिस्तानला जन्मजातच असल्याने या शिकारीच्या बदल्यात पाकिस्तान युएईकडून कर्ज मागतो. शिकारीची हौस भागते, पाकिस्तानमध्ये आठ दिवस मौजमजा करता येते म्हणून युएईचे शेखही कर्ज स्वरूपात पैसे देतात. पाकिस्तानवर इतकी नामुष्की ओढवली आहे की, मुक्या पशुपक्ष्यांचा जीव घेऊन त्यांना पैसे कमवावे लागत आहेत.

पाकिस्तान्यांना याबद्दल काही फतवा वगैरे काढावा असे वाटत नाही. मात्र, मरियमने युएईच्या राष्ट्रप्रमुखांच्या हातावर हात ठेवला, याबद्दल भारी पाप वाटते. तेथील सोशल मीडियामध्ये तर मरियम आणि शेख यांच्याशिवाय दुसरा विषयच नाही. पाकिस्तानच्या सर्व विरोधी पक्षांकडेही सध्या हा एकच विषय की, मरियमने परपुरुषाच्या हातावर हात ठेवलाच कसा? इस्लाममध्ये हराम असलेले कृत्य केले. यावर मरियमच्या समर्थकांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची भूतकाळातली कारकिर्द उजेडात आणली आहे. इमरान पंतप्रधान असताना कसे परदेशात महिलांशी हस्तांदोलन करायचे, याबद्दल चवीने चर्चा रंगल्या आहेत.

एवढेच नाही तर मरियमच्या हस्तांदोलनाबद्दल वादळ उठण्याचे कारणही आहे. मागे एका घटनेसंदर्भात मरियम यांची पाकिस्तानी तपासयंत्रणेकडून चौकशी होणार होती. त्यावेळी “चौकशी करणारे सगळे परपुरूष असल्यामुळे मी त्यांच्यासमोर चौकशीला जाणार नाही,” असा पवित्रा मरियम यांनी घेतला होता. त्यामुळे मरियम आणि युएईच्या राष्ट्रप्रमुखांच्या हस्तांदोलनावर आणि भेटीवर पाकिस्तानमध्ये चांगलेच वाद सुरू आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये कालपरवाच एक घटना घडली. १२ आणि १५ वर्षांच्या दोन बहिणींनी त्यांच्या वडिलांना उभे जाळले. अली अकबर नावाचा ४८ वर्षांचा त्यांचा बाप या दोघींचे लैंगिक शोषण करायचा, अत्याचार करायचा. त्या अत्याचाराला कंटाळून दोघी बहिणींनी त्याला जिवंत पेटवले. या अकबरला तीन बायका आणि दहा मुले. एक बायको वारली होती. अकबर त्याच्या १२ आणि १५ वर्षांच्या मुलींवर अत्याचार करायचा आणि हे त्याच्या दोन बायकांना माहिती होते. पण, त्या मूग गिळून गप्प होत्या. त्यांनी अकबरच्या घाणेरड्या कृत्याला मूकसंमतीच दिली होती. अकबर झोपेत असताना या दोन मुलींनी पेट्रोल त्याच्या अंगावर टाकून त्याला जिवंत जाळले. दोन मुलींना पाकिस्तानी पोलिसांनी पकडले आहे. पाकिस्तानमध्ये मरियमविरोधात फतवा काढावा, अशी मोहीम सुरू झाली आहे. मौलवी ते मुल्ला आणि उलेमा पाकिस्तानच्या या अत्याचारित पीडित दोन मुलींना खरा न्याय मिळावा, यासाठी फतवा काढतील का? या मुलींना न्याय मिळेल का? फतवा काढणार्‍यांच्या कक्षेत या दोन मुलींच्या यातना आणि त्यांच्या आयांची लाचारी यांचे स्थान काय आहे?

९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.