कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकारणासाठी आता धार्मीक उत्सवाला लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की कुंभमेळ्यापेक्षा मोठा उत्सव हा गंगासागर मेळ्याचा असतो. या मेळाव्याला राष्ट्रीय दर्जा मिळावा म्हणून आम्ही गेली अनेक वर्ष काम करत आहोत. कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकार कोट्यावधी रूपये खर्च करतं, मात्र गंगासागर मेळ्यासाठी सगळा खर्च पश्चिम बंगाल सरकार करत असतं असं सुद्धा ममता बॅनर्जी म्हणाल्या.
गंगासागर मेळा हा कपिल मुनी यांच्या मंदिरालगत दरवर्षी साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या निमित्ताने हजारो भाविक इथे एकत्र जमतात. सागर बेटावर जाण्यासाठी भाविकांना मुरीगंगा नदी ओलांडून जावं लागतं. कोलकाता शहरापासून सुमारे १३० किलोमीटर लांब हा उत्सव साजरा केला जातो. भाविकांची तीर्थयात्रा सुरळीत पार पडावी म्हणून अनेक खासगी संस्था कार्यरत असतात. दिनांक ९ जानेवारी ते १७ जानेवारी गंगासागर मेळा या वर्षी साजरा केला जाणार आहे. दोन धार्मीक उत्सवांची तुलना करत ममता दिदींकडून जाणीवपूर्वक नव्या वादाला तोंड फोडलं जात असल्याचं बोललं जात आहे.