जालना : (Santosh Deshmukh Murder Case) बीड मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी तसेच सरपंच देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अश्या मागण्या या मोर्च्याद्वारे करण्यात येत आहेत. आज आज जालना येथे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच देशमुखांच्या हत्येविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी मोठा जनसमुदाय एकवटलेला दिसून आला.
या मोर्च्यात बोलताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला अश्रू अनावर झाले. वैभवी देशमुख म्हणाली की, "आज आमच्या कुटुंबाचा, गावकऱ्यांचा आनंद आमच्यापासून हिरावून घेतला आहे. तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभे राहू शकलो, तुमच्यामुळेच आम्ही न्यायाचा लढा पुढे नेऊ शकलो. आपल्याला न्याय मिळवायचा आहे. त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने एकत्र येऊन आमच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे उभे राहिलात तसेच आमच्या पाठीमागे सदैव उभे राहा"
माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारलं?
तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले आहे. आम्ही ज्या वेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की आम्हाला चालू द्या. त्यासाठी मी तुमचे आभार मानते. पण आज माझा आरोपींना एक प्रश्न आहे की, का तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून मारलं? आज आम्हाला रस्त्याने चालताना धक्का लागतोय त्यांना त्यावेळी किती वेदना झाल्या असतील, याचं मला उत्तर पाहिजे."
वडिलांच्या आठवणीत लेकीची भावनिक साद
"मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की, मी देशमुख कुटुंबातील मुलगी आहे, माझ्या आई-वडिलांची लेक आहे. पप्पा, तुम्ही आज जिथे कुठे असाल तिथे हसत रहा आणि आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, असे म्हणताना वैभवीला अश्रू अनावर झाले होते.