जगभरातील भारतीय समुदाय देशाच्या आर्थिक विकासात सक्रियपणे योगदान देत आहेत. दिग्गज कंपन्यांमध्ये काम करणारे भारतीय असोत वा आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेले, या भारतीयांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे महत्त्व अधोरेखित करण्याचे काम अगदी नेमकेपणाने केले आहे.
ओडिशा येथील ‘प्रवासी भारतीय दिवस संमेलना’चे उद्घाटन कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. जगभरातील विविध भागांत भारतीय बहुसंख्येने असून, हे अनिवासी भारतीय देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देतात. म्हणूनच ‘प्रवासी भारतीय दिवस’ हा भारत आणि जगभरातील भारतीय यांच्यातील बंध मजबूत करण्यासाठीच साजरा केला जातो. भारत, भारतीयत्व, आपली संस्कृती आणि प्रगती एकत्र साजरी करण्यासाठी या दिनाचे विशेष महत्त्व. ‘भारतीय जनसमुदायाला मातृभूमीशी जोडणारे व्यासपीठ’ असेही या कार्यक्रमाला संबोधित करता येईल. भारताच्या विकासातील या समुदायाचा सहभाग वाढविण्यासाठीही या माध्यमातून विविध उपाय राबविण्यात येऊ शकतात. मातृभूमीशी असलेल्या आपल्या संबंधांची नव्याने जाणीव करून देणे, तसेच त्यांच्या मनात अभिमानाची भावना जागृत करणे, अशी भावना त्यामागे आहे. जगभरातील भारतीय समुदायाचा सर्वाधिक प्रभावी वापर जर कोणी करून घेतला असेल, तर तो पंतप्रधान मोदी यांनीच! म्हणूनच, त्यांच्या प्रत्येक विदेशीवारीत ते या भारतीयांशी संवाद साधण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करतात. अमेरिका असो वा ऑस्ट्रेलिया, गर्दीचे नवनवे उच्चांक अशा कार्यक्रमांनी गाठलेले दिसून येतात. ऑस्ट्रेलियात तर तेथील पंतप्रधानांनी व्यासपीठावर जाहीरपणे ‘द बॉस’ असे मोदींना संबोधले होते, ते अतिशय यथार्थ असेच.
भारतीय कुशल मनुष्यबळाला जगभरातून वाढती मागणी आहे आणि हे लक्षात घेतच केंद्र सरकारने कौशल्य विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. देशाची मोठी लोकसंख्या ही युवा असून, या युवा वर्गाला प्रशिक्षण देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. कौशल्याधारित मानव संसाधन विकसित करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. वैश्विक स्तरावर स्पर्धा वाढत असताना, विविध उद्योगांमध्ये कौशल्ययुक्त मनुष्यबळाची मागणीदेखील वाढत आहे. भारतातील युवकांना योग्य प्रशिक्षण दिल्यास ते रोजगाराच्या नव्या संधी मिळवू शकतात आणि त्यातूनच ते देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देऊ शकतात. त्यासाठी केंद्र सरकारने कौशल्य विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यात ‘प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने’चा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. या योजनेद्वारे प्रशिक्षित युवकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. उद्योगांच्या गरजेनुसार त्यांना रोजगार मिळेल, याची खात्री यातून केली जाते. कौशल्य विकासासाठी उत्कृष्टता केंद्रांची स्थापनादेखील केली जात आहे. अशा केंद्रांमधून उच्च तंत्रज्ञानाच्या ज्ञानासोबतच व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये टेक्निकल इन्स्टिट्यूट्स, इंडस्ट्री असोसिएशन्स आणि एंटरप्रेन्योरशिप कार्यक्रमांचा समावेश आहे. भारताच्या कुशल मनुष्यबळाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले जाते. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यासाठीच भारतातून आपले कामकाज चालविण्यासाठी इच्छुक आहेत. यातूनच, भारतीय युवकांना जागतिक पातळीवर काम करण्याची संधी प्राप्त होते.
कौशल्य विकास केवळ आर्थिक फायदाच देते असे नाही, तर सामाजिक लाभही देणारे ठरते. सर्व स्तराच्या युवकांना कामाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी तसेच, गरिबी कमी करण्यासाठी कौशल्य विकास हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कौशल्याधारित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार जी धोरणे राबवत आहे, त्यातून न केवळ देशाच्या आर्थिक वाढीत सक्रिय योगदान मिळते, तर समाजातील विविध घटकांचा विकासही साध्य होतो. कौशल्ययुक्त युवा जगाच्या आर्थिक वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात. कौशल्ययुक्त मनुष्यबळाची विविध उद्योगांना आवश्यकता असून, उद्योगांना अपेक्षित असलेल्या गुणवत्ता वाढीसाठी ते मदत करते. हा कौशल्य विकास जागतिक बाजारात स्पर्धात्मकता वाढवणारा ठरत असून, याचा थेट परिणाम नवोद्योग आणि उपक्रमांच्या विकासातदेखील होताना दिसून येतो. भारतीय युवकांना विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी यातून मिळत आहे. त्यामुळे भारताचे जागतिक अर्थकारणातील योगदानही वाढीस लागले आहे.
भारतीयांना जागतिक पातळीवर विशेषतः जर्मनी आणि इस्रायल यांसारख्या देशांमध्ये खूप मागणी आहे. जर्मनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. जर्मनीच्या औद्योगिक क्षेत्रात, विशेषतः ऑटोमोटिव्ह, मशीने आणि हार्डवेअरच्या विकासामध्ये भारतीय तंत्रज्ञ आणि अभियंते मोठ्या संख्येने आढळतात. जर्मनीतील नामवंत कंपन्या भारतीयांना आकर्षित करताना दिसून येतात. इस्रायलमध्ये कृषी तंत्रज्ञान आणि जलतंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी भारतीय तज्ज्ञांना मोठी मागणी आहे. इस्रायलमध्ये एक सशक्त नवोद्योग संस्कृती असून, भारतीयांना ती आकर्षित करत आहे. अनेक भारतीय नवोद्योग इस्रायलमध्ये यशस्वी झालेले असून, त्यामुळेच इस्रायली कंपन्या भारतीय प्रतिभेसाठी आपले दरवाजे खुले करताना दिसून येतात. भारतीयांचे इंग्रजी भाषेवर असणारे प्रभुत्व तसेच, संगणकासह सर्वच क्षेत्रातील त्यांनी मिळवलेले ज्ञान त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नवनव्या संधी देणारे ठरते.
जगभरातील अनेक देशांत भारतीय मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. त्यांच्या योगदानामुळे त्या-त्या देशातील अर्थव्यवस्था व संस्कृतीमध्ये त्यांनी स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. भारतीय उद्योजक आणि तंत्रज्ञ तेथील दिग्गज कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर आहेत. ‘अॅपल’, ‘गुगल’, ‘मायक्रोसॉफ्ट’ यांसारख्या दिग्गज कंपन्यांमधील भारतीयांनी आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित केली आहे. त्याशिवाय, भारतीय डॉक्टर, विशेषतः नर्सिंग, सर्जरी आणि इतर आरोग्य सेवा क्षेत्रात काम करत आहेत. भारतीय व्यावसायिकांनी कॅनडामध्ये अनेक उद्योग सुरू केले असून, ते तेथील अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असेच आहेत. इंग्लंडमध्ये विशेषतः भारतीय डॉक्टर मोठ्या संख्येने दिसून येतात. भारतीय आपल्या कौशल्याने ऑस्ट्रेलियाच्या कृषी क्षेत्रात देखील योगदान देत आहेत. सिंगापूर, दुबई, आखाती देश येथे म्हणूनच भारतीय समुदाय मोठ्या संख्येने आहे.
प्रवासी भारतीयांचे भारतासाठी आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व फार मोठे आहे. भारतीय प्रवासी समुदाय जगभरात सुमारे चार कोटी इतके आहेत. ते आपल्या कुटुंबांना भारतात आर्थिक पाठबळ देतात. प्रतिवर्ष हे भारतीय आपल्या कुटुंबांना किमान ७०-८० अब्ज डॉलर्स पाठवतात. भारताच्या अर्थव्यवस्थेत त्यांचे हे मोलाचे योगदान आहे. तसेच, हे भारतीय अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत असून, यात रिअल इस्टेट, तंत्रज्ञान, आरोग्य आणि ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यांच्या गुंतवणुकीमुळे भारतातील उद्यमशीलतेला प्रोत्साहन मिळते. उच्च शिक्षण तसेच अनुभवामुळे, भारतीय तज्ज्ञ उद्योगांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात, भारतीयांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोलाची भूमिका बजावलेली दिसून येते. भारतीय त्यांच्या संस्कृती, भाषा आणि परंपरांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे भारताची सांस्कृतिक समृद्धता अधोरेखित होते. हे भारतीय जगभरात भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करताना दिसून येतात. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड येथे भारतीय तेथील राजकारणात सक्रिय असल्याने, ते भारताच्या हितासाठी प्रयत्नशील असल्याचे वारंवार दिसून आले आहे. भारतीयांचे हे जाळे विविध उद्योगांमध्ये भारताचे वर्चस्व वाढवायला तसेच, व्यापार व सहयोग साधायला मदत करणारे ठरले आहे. जगभरातील हे भारतीय देशासाठी एक महत्त्वाचा आर्थिक स्रोत असून, त्यांच्या योगदानामुळे भारताची अर्थव्यवस्था, सांस्कृतिक ओळख व जागतिक उपस्थिती ठसठशीत झाली आहे. भारतातील विकास प्रक्रियेत त्यांची भूमिका अनन्य अशीच असून, त्यांचे हे योगदान भविष्यातील प्रगतीतही तितकेच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.