CRPF मधून निवृत्त होणाऱ्या प्रशिक्षित श्वानांना मिळणार हक्काचे घर

    10-Jan-2025
Total Views |

CRPF DOGS
 
नवी दिल्ली : (CRPF) केंद्रीय राखीव पोलिस दलातून (सीआरपीएफ) निवृत्त होणाऱ्या प्रशिक्षित श्वानांना आता सर्वसामान्य नागरिकांना दत्तक घेता येणार आहे. यासाठी 'सीआरपीएफ'कडून या ऑनलाइन सेवेचे लोकार्पण करण्यात आले असून, आता निवृत्तीनंतरही श्वानांना हक्काचे घर मिळणार आहे. सुरक्षा दलाकडून त्यांचे प्रशिक्षित श्वान दत्तक देण्यासाठी राबविलेली ही पहिलीच योजना आहे.
 
केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दले आतापर्यंत सेवानिवृत्त झालेले श्वान नोंदणीकृत बिगरसरकारी संस्थांकडे किंवा नामांकित संस्थांकडे संगोपनासाठी दिले जात होते. बेल्जियन शेफर्ड मॅलिनॉइस, जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर आणि देशी मुधोल हाउंड या चार जातींतील ३० हून अधिक श्वान या प्रक्रियेद्वारे दत्तक घेता येणार आहे. बंगळुरूजवळील 'सीआरपीएफ'च्या 'डॉग ब्रीडिंग अँड ट्रेनिंग स्कूल'द्वारे या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
 
८ ते १२ वर्षे वयोगटातील हे श्वान असून देशभरातील नक्षलविरोधी, दहशतवादविरोधी शेकडो कारवायांमध्ये ते सहभागी झाले आहेत. माओवाद्यांच्या हल्ल्यांतून, कारवायांतून असंख्य सैनिकांचे प्राण त्यांच्यामुळे वाचले आहेत. बाळू, स्वीटी, वीरू, मोबी, कोको, स्ट्रोल आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी स्फोटके शोधणे, गस्त घालणे अशी कामगिरी पार पाडली आहे.
 
श्वान दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण मोफत असून, श्वानांची विक्री केली जाणार नाही. 'सीआरपीएफ'च्या संकेतस्थळावर या प्रक्रियेचे पूर्ण तपशील उपलब्ध आहेत. तसेच, या श्वानांची माहिती आणि छायाचित्रे आहेत. दत्तक घेताना कुठला हेतू आहे, याची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच, भविष्यात या श्वानांना कशा प्रकारे सांभाळले जाईल, त्यांची निवासव्यवस्था कशी असेल याचा तपशील द्यावा लागणार आहे.
 
"सेवानिवृत्त श्वानाला जिथे ठेवण्यात आले आहे, तेथे दत्तक घेणारी व्यक्ती आणि श्वान यांची भेट घडवण्यात येईल. श्वान प्रशिक्षकांनी त्यांना प्रशिक्षण दिलेले असल्याने ते घरी रुळू शकतील", असे एका अधिकाऱ्याने सांगितले. श्वानाच्या दत्तक प्रक्रियेच्या अटी व शर्तीमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की, त्यांचा कोणत्याही प्रकारे दुरुपयोग केला जाणार नाही किंवा त्यांच्याकडून गैरवर्तन करून घेतले जाणार नाही. तसेच त्यांची विक्री करण्यात येणार नाही असेही यात म्हटले आहे.