बालपण मराठवाड्यात घालविलेल्या एका तरुणाने जोपासलेल्या विविधांगी छंदांमुळे त्याचे जीवन कसे बदलून गेले, त्याची ही यशोगाथा...
उच्च शिक्षण घेतलेल्या अभिजीत भुजबळ यांनी आपण जोपासलेल्या छंदास अधिक वाव मिळावा, म्हणून पुण्यातील ‘भारत इतिहास संशोधन मंडळा’त मोडी लिपी अभ्यासली. आज ते एक नाणी अभ्यासक, नाणी संग्राहक असले, तरी गडकिल्ले अभ्यासक म्हणूनदेखील ख्यातनाम आहेत.
अभिजीत यांनी महाविद्यालयीन जीवनापासून विविध नाणी गोळा करण्याचा छंद जोपासला. जवळपास गेले एक तप ते नाणीसंग्रह करीत असून, त्यांची ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. नाणी गोळा करता करता त्या नाण्यांपाठीमागे त्याचा नेमका काय इतिहास आहे, हेदेखील त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे, त्यांनी नाण्यांविषयी लेखनदेखील सुरू केले. त्यांचे याबाबत विविध मासिके व वृत्तपत्रांमध्ये लेखही प्रसिद्ध होत असतात. सध्या जवळपास चार हजार व त्याहून अधिक प्राचीन नाणी, शिवकालीन नाणी, शिवपूर्वकालीन नाणी, ब्रिटिशकालीन नाणी, विविध देशांची नाणी, चलनं, जुनी टपाल तिकिटे, पाकिटे यांचा संग्रह त्यांनी आजपर्यंत केलेला आहे आणि हा छंद ते अव्याहत जोपासत आहेत.
त्यांच्या नाण्याच्या संग्रहामध्ये सोने, चांदी, तांबे, शिसे, पितळ, अॅल्युमिनियम, स्टील या धातूंची नाणी समाविष्ट आहेत. त्याचप्रकारे काही नाणी ही अतिदुर्मीळ स्वरूपाची आहेत. त्यांच्या संग्रहामध्ये १ हजार, २००च्या वर छत्रपती शिवाजी महाराज यांची नाणी आहेत. एक हजार व अधिक मुघल, बहामनी, दिल्ली सलतनत, निजामशाही अशी शाही घराणे तसेच, भारतामधील संस्थानिक घराण्यांची, ब्रिटिश राजवटीची नाणीदेखील त्यांच्या संग्रहात आहेत. दीडशेपेक्षा अधिक देशांच्या नोटा व नाणी संग्रही ठेवणार्या अभिजीत यांच्याकडे याशिवाय दोन हजार व अधिक भारतीय व विदेशी टपाल तिकिटे, पाकिटे आणि भारतीय संस्थानिक घराण्यांची नाणी, स्टॅम्पदेखील संग्रही आहेत.
फक्त नाणी संग्रहित करणे हे ध्येय न बाळगता, त्यांची माहिती ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी व विशेषकरून आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाण्यांविषयीची माहिती सार्यांना ज्ञात व्हावी, यासाठी अभिजीत या नाण्यांचे प्रदर्शन विविध ठिकाणी भरवित असतात. एवढेच नव्हे, तर त्याविषयीची माहितीही ते सर्वांना देत असतात. या त्यांच्या अनोख्या कार्याची दखल घेत, विविध संस्था आणि प्रतिष्ठानांकडून त्यांना मानचिन्ह व मानपत्रक देऊन सन्मानितदेखील करण्यात आले आहे.
नाणे जमा करण्याची आवड त्यांना त्यांच्याच एका आवडीच्या कारणामुळे लागली होती; ते कारण म्हणजे भटकंती! महाविद्यालयीन जीवनात त्यांना गडकिल्ले फिरणे, मंदिरे, जुन्या वास्तू पाहणे याची फार आवड होती व अजूनही आहे. हे सर्व करतानाच, त्या ऐतिहासिक वास्तूंविषयीचे त्यांचे आकर्षण अधिकाधिक वाढत गेले व फिरता फिरता ते इतिहासात रमू लागले. इतिहासाबद्दलचा त्यांचा रस अधिकाधिक वाढत गेला. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या असलेल्या इतिहासामुळे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फिरत असतानाच, त्यांच्या इतिहासामध्ये डोकावून पाहताना, त्यांना नकळतच ऐतिहासिक वस्तू जतन करण्याची आवड निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाणे ‘शिवराई’ हातात पडताच, त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पहिली ‘शिवराई’ हातात पडल्यानंतर त्याविषयीचे त्यांचे आकर्षण वाढतच गेले व हे नाणे अजून गोळा करण्यासाठीची धडपडही वाढत गेली. एका राज्याची नाणी गोळा करता करता इतर राजांची, विविध संस्थानांची, ब्रिटिश भारताची, स्वतंत्र भारताची, विविध देशांची नाणी गोळा करणे म्हणजे हा ‘छंद जिवाला लावी पिसे’ अशी त्यांची अवस्था होत गेली.
अभिजीत भुजबळ सध्या एका खासगी कंपनीत ‘लेखापाल’ म्हणून कार्यरत आहेत. ‘पुणे माळी महासंघा’च्या युवक उपाध्यक्षपदी ते सक्रिय आहेत. शिवाय, ‘मल्हार ट्रेकर्स’सारख्या सामाजिक संस्थेचेदेखील ते सभासद म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांना भ्रमंतीची आवड आहे. यामुळे ते जोपासत असलेल्या छंदास अधिक गती मिळते, असे त्यांना वाटते. आतापर्यंत जवळपास 300हून अधिक ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले, मंदिरे, वाडे यांची भ्रमंती त्यांनी केली आहे. भविष्यात त्यांची गडकिल्ल्यांविषयी माहिती संकलित करण्याचे त्यांचे नियोजन आहे.
एखाद्या छंदाची सुरुवात ही घरातूनच होते. अभिजीत यांचीही विविध देशांची नाणी गोळा करण्याची सुरुवात ही घरातूनच झाली. आईवडील नेपाळला गेले असताना, त्यांनी परत येताना तिथली नाणी, चलनी नोटा घेऊन आले होते आणि त्यासोबत अनेक मित्रमंडळींनी, अनोळखी व्यक्तींनीदेखील नाणी प्रदर्शनादरम्यान त्यांच्याकडील नाणी त्यांना दिली. आता तर या नाण्यांची ओळख घरातील त्यांच्या पत्नीलादेखील झाली आहे. दैनंदिन व्यवहार करत असताना एखादे वेगळे नाणे दिसताच ते नाणे त्यांची अर्धांगिनी त्यांच्या हातात ठेवते. या सर्वांच्या मदतीने व सहकार्याने हा छंद जोपासताना नवीन लोकांचीदेखील ओळख करून घेता आल्यामुळे यात आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण करता येईल का, याबाबतदेखील विचार सुरू असल्याचे ते अभिजीत भुजबळ सांगतात.
नाणीसंग्रह करण्याचा छंद जोपासत असताना, त्यांना महाराष्ट्रातील अनेक राजघराणे तसेच, सरदार घराणी व त्यांचे वंशज यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्या या अनोख्या अभ्यासपूर्ण आणि कुतूहलजन्य कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
अतुल तांदळीकर
९७६४०८५०२५