आरोपी कृष्णा आंधळे गेल्या दीड वर्षांपासून फरार, संतोष देशमुखांच्या भावाकडून लवकर कारवाई करण्याची मागणी

    10-Jan-2025
Total Views |

dhananjay deshmukh
 
जालना : (Krishna Andhale) बीड मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील एक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. याचदरम्यान संतोष देशमुखांच्या भावाकडून लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
काय म्हणाले धनंजय देशमुख?
 
"या गुन्ह्यातील जो आरोपी फरार आहे त्याची पार्श्वभूमी पाहिली तर लक्षात येईल की त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच गेल्या दीड वर्षांपासून तो एका गंभीर गुन्ह्यात फरार होता आणि आता या गुन्ह्यातही तो फरार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अटक करुन योग्य कारवाई करावी", अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे.
 
"मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की, कुणालाही सोडलं जाणार नाही..."
 
मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी चांगल्या रितीने समजून घेतले. तब्बल ५० मिनिटे त्यांनी आम्हा देशमुख कुटुंबियांना वेळ दिला. आमचे सगळे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की, कुणालाही सोडलं जाणार नाही.