जागावाटपात वेळ घालवण्यामागे षडयंत्र? पटोले आणि राऊतांचं नाव घेत विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
10-Jan-2025
Total Views |
नागपूर : जागावाटपात घालवलेला वेळ हेदेखील महाविकास आघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. परंतू, हा वेळ घालवण्यामागे काही षडयंत्र होते का? असा संशय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार, १० जानेवारी रोजी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांवर पराभवाचे खापर फोडले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "विधानसभेला फटका बसण्याची अनेक कारणे असली तरी जागावाटपाला झालेला उशीर हे कारणसुद्धा नक्कीच आहे. आम्ही २० दिवस जागांचा घोळ ठेवला. नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते तिथे होते. आम्हीसुद्धा होतो. परंतू, जागावाटपाचा तिढा जर दोन दिवसांत संपला असता तर १८ दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लानिंगसाठी उपयोगी पडले असते. पण आम्ही कुठलेही प्लानिंग करता आले नाही, निवडणूकीसाठी तिन्ही पक्षांना संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. ही अनेक कारणे पुढे आली. त्यामुळे जागावाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका आम्हाला नक्की बसला."
"इतका वेळ घालवण्यामध्ये काहीतरी प्लानिंग आहे का? बैठकीची वेळ ११ वाजता आणि यायचे २ वाजता. अनेक नेते उशीरा यायचे. त्यात मी कोणाचे नाव घेणार नाही. पण यामुळे बैठकांचा वेळ लांबत गेला. एका जागेवर वारंवार त्याच त्या गोष्टी होत गेल्या. कदाचित महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा घोळ दोन दिवसांत संपला असता तर आम्हाला नक्की फायदा झाला असता. पण हा वेळ घालवण्यामागे काही षडयंत्र होते का? अशी शंका घेण्यास हरकत नाही," असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केला आहे.