साडे तीन वर्षांचे बालक झाले संत, कुंभमेळ्यात चर्चेचा विषय
10-Jan-2025
Total Views |
लखनऊ : महाकुंभमेळा (Kumbh Mela) हा १२ वर्षानंतर भारतात भरवला जातो. महाकुंभमेळा हा सनातन धर्माचा जीव असल्याचे बोलले जाते. संत महंत या कुंभमेळ्यात सहभागी होतात. अशातच आता २०२५ च्या या महाकुंभमेळ्यामध्ये एक चिमुरड्या बालकाचाही सहभाग आहे. एका छायाचित्रामध्ये लहान मुलगा कपाळावर भस्म आणि भगव्या कपडे परिधान केलेला दिसत आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या चिमुरड्याचे नाव हे श्रवण पुरी असून त्याचे वय हे अवघे साडे तीन वर्षे आहे. जुन्या आखाड्याने या चिमुरड्याला संत पदाचा दर्जा बहाल केला आहे. श्रवण पुरी हा जुन्या आखाड्यात सहभागी होतो. आपल्या बोबडया बोलामध्ये तो श्लोक मंत्र बोलत असतो. साधारणत: लहान मुले ही चॉकलेट खाण्याचा हट्ट करतात. मात्र, श्रवण पुरी हा फळे खातो.
श्रवण पुरीला हरियाणाच्या फतेहबादमध्ये एका दाम्पत्याने आश्रमामध्ये दान केले होते. तेव्हा ते बालक अवघ्या तीन महिन्यांचे होते. तेव्हापासून आश्रमात असणाऱ्या संबंधितांनी त्याची काळजी घेतली होती. त्यांच्यावर संस्कार केले होते. दम्पत्याचा नवस पूर्ण झाल्याने दाम्पत्यांनी त्याला दान केले असे सांगण्यात येत आहे.
त्याचे वय पाहता तो अगदी कमी वयातील संत असल्याचे बोलले जात आहे. त्याला पाहिल्याने अनेकजण थक्क झाले आहेत. चिमुरडा बालक संत कसा काय हे पाहून लोकांना आश्चर्य वाटते.