कोणालातरी सर्वाधिक जागा लढवून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं! संजय राऊतांचं विधान
10-Jan-2025
Total Views |
मुंबई : कोणालातरी सर्वाधिक जागा लढवून राज्याचे मुख्यमंत्रीपद हवे होते, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे. जागावाटपास झालेला विलंब हे विधानसभेतील पराभवाचे मुख्य कारण असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. शुक्रवार, १० जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत राऊतांनी यावर प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले की, "जागावाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीन लांबली गेली त्याची गरज नव्हती, हे आमच्या सगळ्यांचेच म्हणणे आहे. ती प्रोसेस का, कुणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावs. शरद पवार साहेब, जयंत पाटील किंवा आम्ही शिवसेनेचे सर्व नेते अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेले नव्हते हे सत्य आहे. कोणत्याही आघाडीमध्ये जागावाटप इतक्या विलंबाने झाले तर एक अस्वस्थता पसरते. कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही. याउलट महायुतीमध्ये साधारण दोन महिन्यांपूर्वी जागावाटप संपलेले होते. विजय वडेट्टीवार यांची वेदना आहे ही संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्यात आणि त्या स्विकारल्या पाहिजे. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागावाटप झाले हे आता आम्हाला कळते आहे. तेव्हाही आम्ही सांगत होतो. पण आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही."
"जागावाटपावरून नाना पटोले आणि माझ्यात वाद सुरु होता. काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि त्यांनी सर्वात कमी जागा जिंकल्या. आम्ही २० जागा जिंकलो. पण आता त्यात कशासाठी वाद घालायचा? जागावाटपाला विलंब झाला आणि त्या जागावाटपात मिस्टर वडेट्टीवारदेखील होतेच. विदर्भातील काही जागा वडेट्टीवारांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोडल्या असत्या तर बरं झालं असतं. काही लोकांना वाटत होतं की, आता आम्हीच जिंकू, आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे. देशातील वातावरण बदललं वगैरे. पण आपण एकत्र लढलो पाहिजे, समोर मोठे आव्हान आहे, असे आमचे म्हणणे होते. त्यामुळे याला सगळेच जबाबदार आहेत," असे राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या. अनेक जागांबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही. कोणालातरी सर्वाधिक जागा लढवून राज्याचे मुख्यमंत्रीपद हवे होते. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने म्हणावा तसा हस्तक्षेप केला नव्हता. महाराष्ट्रासारखे राज्य महाविकास आघाडीच्या हातून जाणे ही या राज्यासाठी दुर्घटना आहे."