समाजवादी नेते एस.एम. जोशी यांच्यावर आधारित वेबसाइटचे जाहीर प्रकटन

    10-Jan-2025
Total Views |

smjoshi
 
पुणे : ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या महाभूषण प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेली समाजवादी नेते एस.एम. जोशी यांच्यावर आधारित वेबसाइटचे जाहीर प्रकटन शनिवारी ११ जानेवारी रोजी ‘ओगले हॉल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रोड शाखा, शुक्रवार पेठ, पुणे’ येथे करण्यात येणार आहे. एस.एम. जोशी फाउंडेशनचे माजी अध्यक्ष सुभाष वारे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेबसाईटचे लेखन व निर्मिती गिरीश घाटे यांनी केली आहे.
 
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने १९०० ते १९३० या काळात जन्मास आलेल्या आणि महाराष्ट्राच्या साहित्य, समाज व संस्कृती यांना आकार देणाऱ्या महनीय व्यक्तींच्या वेबसाइट घडवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचा आरंभ साने गुरूजींचे साहित्य कॉपीराईटमुक्त झाल्यावर त्यांच्यासंबंधीच्या वेबसाईटने झाला. ती वेबसाइट मागील पंधरा वर्षांत अडीच-तीन कोटी वाचकांनी पाहिली/वाचली आहे. त्याबाबत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्यानंतर, काही महिन्यांपूर्वी रामानंद तीर्थ यांच्यावरील वेबसाइट तयार करण्यात आली. त्याच वेळी बा.सी. मर्ढेकर, लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वेबसाइटचे काम वेगवेगळ्या व्यक्तींवर सोपवण्यात आले आहे.
 
या प्रकल्पाचे दुसरे अंग आहे. ते म्हणजे महनीय व्यक्तींच्या वेबसाईट घडवण्याचे काम काहींच्या बाबतीत त्यांच्या नातेवाईकांनी केले आहे. अशा वेबसाइटची लिंकही ‘महाभूषण प्रकल्पा’स देण्याचा बेत आहे. उदाहरणार्थ, भा.रा. तांबे यांचे नातू सुनील तांबे यांनी राजकवींबद्दलची वेबसाइट अलिकडेच घडवली. तिची लिंक ‘महाभूषण प्रकल्पा’त दिली आहे. त्याच प्रमाणे लेखक, पटकथाकार रघुवीर सामंत यांची वेबसाइट त्यांचे चिरंजीव दीपक सामंत यांनी तयार करत आणली आहे. तिचाही समावेश महाभूषण प्रकल्पात होईल.