मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Nandalalji in HSSF event) 'परमेश्वराला कधी विस्मरू नका, आपल्यातील सात्विक-लौकिक शक्ती निर्माण करायला विसरू नका, कुठल्याही परिस्थितीला हिंमतीने तोंड देऊन पुढे जायला शिका.' असे म्हणत कुटुंब प्रबोधिनी गतिविधीचे राजस्थान प्रांत प्रमुख नंदलालजी यांनी प्रगतीच्या त्रिसुत्रींचे पालन करण्याचे आवाहन शालेय विद्यार्थ्यांना केले आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगुर नगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव (प) येथे सुरु असलेल्या 'हिंदू अध्यात्मिक सेवा मेळाव्या'त ते बोलत होते. मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी 'आचार्यवंदन' कार्यक्रम संपन्न झाला. तेव्हा नंदलालजी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
हे वाचलंत का? : निःस्वार्थभावे केलेली समाजसेवा हीच ईश्वरसेवा : महंत गोविंददेव गिरिजी महाराज
विद्यार्थ्यांना संबोधत पुढे ते म्हणाले, 'गुरुवंदन, आचार्यवंदन ही प्रक्रिया भारतीय परंपरेसाठी नवीन नाही. गुरुंना वंदन करणे, मोठ्यांचा आदर करणे अशांमधून आपण आपल्या जीवनात अनेक श्रेष्ठ गोष्टी आत्मसात करत असतो. ही अनंत काळापासून चालत आलेली प्रक्रिया आहे. आज 'आचार्यवंदन' कार्यक्रमातून त्याचेच पुनर्स्मरण होत आहे.'
गुरु आणि आचार्य यांच्यातील फरक मांडताना नंदलालजी म्हणाले, 'भारतीय परंपरेत गुरु हे एक तत्व आहे तर आचार्य म्हणजे आपल्या आचरणातून समग्र जीवनदृष्टी देणारी व्यक्ती. निरंतर मेहनत आणि अविरत परिश्रमानेच एखाद्यास आचार्य होता येते. आचार्य म्हणजे केवळ शिक्षक नव्हे. तो शिकवतो पण हळू हळू शिकवणीच्या माध्यमातून जीवन सफल करण्याचे सूत्र देतो. भारतीय इतिहासातील आचार्यांमुळेच अकल्पनीय अशी ज्ञान-विज्ञानची गंगा वाहत आली आहे.'
अय्यप्पा स्वामी मंदिरातील पूजारींच्या प्रमुख उपस्थितीत आचार्यवंदनाच्या विधिवत पूजनाला सुरुवात झाली. दरम्यान सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंचे पाय धुतले, त्यानंतर त्यांचे औक्षण केले.