राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त राज्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन!

जास्तीत जास्त स्टार्टअप्सना सहभागी होण्याचे मंत्री लोढा यांचे आवाहन

    10-Jan-2025
Total Views |
 
Lodha
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. या विशेष दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीद्वारे येत्या १६ जानेवारी रोजी मुंबईत एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रासह देशभरातील स्टार्टअप उद्योजक सहभागी होतील. १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता शहराचे व्यावसायिक आणि कॉर्पोरेट हब बनलेल्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू होणाऱ्या “Empowering Innovation, Elevating Maharashtra” या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याठिकाणी तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषध निर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील उद्योगांतर्फे आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण होणार आहे.
 
हे वाचलंत का? -  मुख्यमंत्र्यांनी घेतली नाना पटोलेंची सांत्वनपर भेट!
 
यावेळी दिवसभरात होणाऱ्या पॅनेल चर्चांमध्ये गुंतवणुकदारांच्या गरजा आणि युवा उद्योजकांच्या यशाच्या कथा यावर विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्टार्टअप कंपन्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. प्राप्त अर्जांपैकी पात्रतेनुसार निवड करून ज्या कंपन्यांची निवड केली जाईल, त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.
 
उद्योजक, युवा, इन्क्युबेटर्स यांना एकत्र आणून राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टिम मजबूत करण्यात हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल. स्टार्टअप क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, पॅनेल चर्चा तसेच स्टार्टअप्सना राज्यस्तरावर आपले विचार सादर करण्याची संधी यामध्ये दिली जाईल. उद्योगक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक, सहकार्य आणि भागीदारी याविषयी सखोल चर्चा आणि मार्गदर्शन केले जाईल. याप्रसंगी काही निवडक स्टार्टअप विजेत्यांचा सत्कारही केला जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्स www.msins.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. १२ जानेवारी २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.