मुंबई : नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरिता महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, ९ जानेवारी रोजी दिले.
पुणे येथील ‘सरहद’ या संस्थेद्वारे आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे होत आहे. या साहित्य संमेलनासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच आजच याबाबतचा शासकीय आदेश जारी करण्यासही त्यांनी सांगितले आहे.
हे वाचलंत का? - कोणालातरी सर्वाधिक जागा लढवून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं! संजय राऊतांचं विधान
"साहित्यप्रेमींच्या निवासाकरिता दिल्लीतील महाराष्ट्र सदन उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही ऑक्टोबर महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. परंतू, पुढे आचारसंहिता लागल्यामुळे त्यास विलंब झाला. सुरुवातीला साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातून ७०० लोक येतील अशी अपेक्षा होती. परंतू, आता ही संख्या दीड हजार इतकी झाली. त्यामुळे साहित्यप्रेमींची योग्य व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही महाराष्ट्र सदन देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची ही मागणी मान्य केली असून तीन दिवसांसाठी महाराष्ट्र सदन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- संजय नहार, आयोजक (सरहद संस्था)