कालपर्यंत ईव्हीएम मशीनला दोष देणारे आता वस्तुस्थितीवर आलेत!
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे : मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
10-Jan-2025
Total Views |
पुणे : कालपर्यंत ईव्हीएम मशीनला दोष देणारे आता वस्तुस्थितीवर आलेत, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. शुक्रवार, १० जानेवारी रोजी त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
जागावाटपास झालेला विलंब हे आमच्या पराभवाचे कारण असल्याचा दावा विजय वडेट्टीवारांनी केला होता. यावरून प्रचंड आरोप प्रत्यारोप करण्यात आले. यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "बरं झाले त्यांनी मान्य केले. कालपर्यंत ते ईव्हीएम मशीनला दोष देत होते. आता वस्तुस्थितीवर आले आहेत. त्यांनी आता थोडा अभ्यास केलेला दिसतो. आणखी थोडा अभ्यास करण्याची गरज असून काय चुकले याचे योग्य आकलन केल्यास गाडी पटरीवर येऊ शकते. लोकसभेच्या निवडणूकीत आमच्याकडून झालेल्या चुका आम्ही दुरुस्त केल्या. जनतेपर्यंत जाऊन त्यांना विश्वासात घेतले. त्यामुळे जनतेने आमचे ऐकले आणि महायुतीला प्रचंड बहुमत दिले."
"महाविकास आघाडीने संभ्रमाचे राजकारण केल्यामुळे त्यांना लोकसभेत मतदान मिळाले. आता आम्ही जनतेला विश्वासात घेतल्याने जनता आमच्या बाजूने आली आहे. महाविकास आघाडी मात्र आता आपसातील वादात पेटलेली आहे. त्यांना विकासाचे व्हिजन नाही. पुढच्या काळात महायुती महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करेल आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करेल. महाविकास आघाडीने खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष देण्यास सुरुवात केली, हे चांगले आहे," असे ते म्हणाले.
तपासात दोषी आढळल्यास मंत्री राजीनामा देणार!
"बीड प्रकरणात वस्तुस्थिती बघितली पाहिजे. तपासात कुठेही धनंजय मुंडे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे येत नाहीत. ज्यादिवशी ते तपासात येतील त्यादिवशी आम्ही कोणालाही सोडणार नाही, असे आमच्या सरकारने सांगितले आहे. तपास इतका मजबूत असावा की, कोणताही आरोपी सुटू नये. त्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्या त्या सरकार करत आहे. ज्यादिवशी मंत्री दोषी आहे असे आढळणार त्यादिवशी ते राजीनामा देतील. पण कोण राजीनामा मागतो आहे? कुणाला आपला आकस काढायचा आहे या आधारे नको. महाराष्ट्रात कुठलेही प्रकरण घडल्यास थेट मंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थितीकडे बघितले पाहिजे. मंत्री त्यात सहभागी असतील तर ते राजीनामा देतील," असे ते म्हणाले.
आरोपीला अंतिम शासन मिळण्यासाठी एकजूटीने काम करा!
"मी स्वत: सुरेश धस साहेबांना भेटलो. उद्यासुद्धा मी भेटणार आहे. या प्रकरणाचे राजकारण झाल्यास तपासाला वेगळे वळण येते. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला अंतिम शासन होईपर्यंत एकजुटपणे काम केले पाहिजे, ही विरोधी पक्षाची, आमच्या पक्षाची आणि सर्वांचीच जबाबदारी आहे. या प्रकरणाचे राजकारण करण्याची गरज नाही. याप्रकरणात मला कुणावरही आरोप करायचा नाही. पण आपल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे तपासात थोडाही किंतू, परंतू राहिल्यास सरळ आरोपीला मदत होईल. त्यामुळे आरोपीला अंतिम शासन करण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. या प्रकरणात राजकीय आणि सामाजिक वळण न येता आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी काम करावे."
पक्षप्रवेश करताना स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेणार!
"कुठल्याही नेत्यांना पक्षप्रवेश देताना स्थानिक भारतीय जनता पक्ष जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत कोणताही पक्षप्रवेश करणार नाही. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद तयार होणार नाहीत याची काळजी आम्ही घेणार आहोत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाला आणि महायुतीच्या नेत्यांना विश्वासात घेऊनच पक्षप्रवेश होणार आहे."
घर चलो अभियान!
"भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वाचे घर चलो अभियान सुरु असून महाराष्ट्राच्या १ लक्ष बुथवर बुथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व संघटना आम्ही घरोघरी जात आहोत. दीड कोटी सदस्य संख्या असलेल्या भारतीय जनता पक्षाचे संघटन आम्ही करतो आहोत. १२ तारखेला शिर्डी येथे आमचे अधिवेशन आहे. जनतेने आम्हाला दिलेल्या मतांमुळे महाराष्ट्रात आमचे सरकार आले. त्यासाठी आम्ही अधिवेशनात अभिनंदन प्रस्ताव मांडणार आहोत," असेही मंत्री बावनकुळेंनी सांगितले.