जनजातींच्या संस्कृतीचे संवर्धक

    01-Jan-2025   
Total Views |
 
दामोदर थाळकर
 
भारत अनेक जनजातींच्या परंपरांनी समृद्ध झाला आहे. या परंपरांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी निभावण्याचे कार्य करणार्‍या दामोदर थाळकर यांच्याविषयी...
 
खेड्यापाड्यातील वाढत्या मतांतरणाच्या घटनांमुळे जनजातींच्या संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे, असे चित्र आपल्याला अनेक ठिकाणी दिसू लागले आहे. एके काळी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात अशीच परिस्थिती होती. मात्र, गेली काही वर्षे जनजातींच्या संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे काम याच तालुक्यातील दामोदर थाळकर हे करत आहेत.
 
पालघर जिल्ह्यात जव्हारमधील दापटी म्हणून एक गाव आहे, जे दुष्काळग्रस्त गाव म्हणून पहिल्या क्रमांकावर होते. जिथे पिण्यासाठी पाणी नाही, पाच किमी प्रवास करून ते आणावे लागायचे. अशा दापटी गावात दि. 16 नोव्हेंबर 1982 रोजी दामोदर यांचा जन्म झाला. आईवडील आणि तीन भावंडे असा त्यांचा परिवार. वडील लहान वयातच त्यांना सोडून गेले, तर आईचे 2004 मध्ये निधन झाले. दामोदर आणि त्यांच्या भावांचे बालपणातील बहुतांश दिवस, मामाच्याच घरी गेले.
 
दामोदर यांचे प्राथमिक शिक्षण वांगणी येथील, जनजाती विकासाच्या शासकीय आश्रम शाळेत गेले. त्यानंतर जामसर विभाग हायस्कुल येथे माध्यमिक शिक्षण झाले. पुढे जव्हारमधील विनवळ गावच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले, तर पदवीचे शिक्षण जव्हारच्या ‘यशवंतराव चव्हाण विद्यापीठा’तून पूर्ण केले. सध्या दामोदर हे 2019 सालापासून, जव्हार तालुक्याच्या बोंडारपाडा गावातील एका शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
 
महाराष्ट्र शासनाने 2000 साली ‘वस्ती शाळा’ म्हणून एक योजना सुरू केली होती. ज्या खेड्यापाड्यात शिक्षण पोहोचलेले नाही, अशा दुर्गम पाड्यांमध्ये शासनाने या योजनेअंतर्गत वस्ती शाळा सुरू केली. हातेरी ग्रामपंचायतमधील, रुई पाड्यात अशीच एक वस्ती शाळा होती. या शाळेत स्वयंसेवक म्हणून, नाममात्र एक हजार रुपये मानधनावर त्यांनी नोकरी सुरू केली. अशा पद्धतीने, 12 वर्षे या शाळेत नोकरी केल्यानंतर शासनाने त्यांना 2014 मध्ये शासकीय सेवेत सामावून घेतले. त्यानंतर बोंडार पाडा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला, जो आजतागायत सुरू आहे.
 
दामोदर यांचे बहुतांश जीवन आई-वडिलांविना गेले, घरची परिस्थितीसुद्धा हलाखीचीच. या कारणास्तव त्यांना समाजातील विविध घटकांचा आधार घेणे भाग पडले. त्याच्यातून पुढे सामाजिक कामांची जाणीव त्यांना होत गेली. लहान वयात मामांकडे बालपण गेले असले, तरी कालांतराने इतर नातेवाईक आणि गावकर्‍यांच्या घरी दिवस काढण्याची वेळ आली.
 
या काळात साधारण चार ते पाच वर्षे सख्ख्या भावांची भेटही झाली नाही. मात्र, समाजाशी त्यांचा संपर्क आणि संवाद वाढत गेला. समाजबांधवांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. दामोदर यांचे मोठे बंधू विनायक थाळकर, जे ‘वयम्’चे अध्यक्ष आहेत, ते पूर्वी एकल विद्यालय चालवायचे. त्यांना भेटायला अनेक कार्यकर्ते यायचे. त्यांच्यात होणारे विषय, त्यांच्या होणार्‍या चर्चा यांचे दामोदर यांना कुतूहल वाटायचे. यातूनच पुढे त्यांची समाजसेवेची आवड वाढत गेली.
 
नाशिकचे निवृत्त प्राध्यापक डॉ. मुंगी यांचा एकदा जव्हारमध्ये प्रवास होता. जव्हारमध्ये असलेल्या काही कुपोषित भागांमध्ये त्यांनी ‘पूरक पोषक आहार योजना’ सुरू केली होती. त्या काळात दामोदर हे त्यांच्यासोबत समाजात फिरायचे. त्यामुळे खेड्यापाड्यात जनजातींची काय सद्यस्थिती आहे, हे त्यांना प्रत्यक्षात पाहता आले. हे काम करत असताना, पुढे ‘जनकल्याण समिती’शी संपर्क आला. तेव्हा समितीचे पालघरमध्ये काम नव्हते. त्यामुळे दामोदर यांनी पुढाकार घेऊन काही वर्षे ‘जनकल्याण समिती’चे काम केले.
 
दामोदर यांनी जनजातींविषयी काम करायचे ठरवले, तेव्हा त्यांना सध्याचे पालघर जिल्हा संघचालक नरेश मराड यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. नरेश मराड हे जनजातींविषयीच्या कामात गेली अनेक वर्षे सक्रिय आहेत. जनजातींविषयी त्यांचा गाढा अभ्यास आहे. नरेश यांच्या संपर्कात आल्यानंतर पुढे ‘जनजाती विकास मंच’च्या अंतर्गत जनजातींमध्ये कार्य करण्यास, दामोदर यांनी सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी, आपल्या समाजातील भरकटलेल्या तरुण पिढीला योग्य मार्गावर आणण्याचे काम हाती घेतले. धर्मांतरणाचा विषयही तसा गंभीरच होता. कारण धर्मांतरण झाल्यामुळे, अनेक जनजातींची खरी संस्कृती मुळासकट नष्ट झाल्याचे, दामोदर यांनी डोळ्यादेखत पाहिले आहे. आपल्या जुन्या चालीरिती नष्ट झाल्या, तर आपला धर्मही नष्ट होईल? अशी भीती त्यांना कायम होती. जनजातींचे भविष्य धोक्यात आहे, हे तेव्हा त्यांनी ओळखले आणि अशा गोष्टींबाबत जनजातींमध्ये जनजागृती करण्याचे काम दामोदर आज करत आहेत. ‘जनजाती विकास मंच’च्या माध्यमातून, संस्कृती टिकवण्याचे काम खेड्यापाड्यात जाऊन ते करत आहेत.
 
बिरसा मुंडा जयंतीचे औचित्य साधून , त्यांनी एकदा संपूर्ण पालघर जिल्ह्यातून कार्यकर्त्यांच्या मदतीने, जनजातींच्या संस्कृतीचे जे खरे वारसदार आहेत त्यांचे एकत्रीकरणही केले होते. त्यांना सोबत घेऊन ते आपले कार्य इतर जनजातींपर्यंत पोहोचवत आहेत. दामोदर म्हणतात, पुरस्कार मिळावा यासाठी ते हे काम करत नाहीत. केवळ नोकरी करून उरलेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा, म्हणून हे काम सुरू आहे. काही वर्षांपूर्वी जनजातींच्या एका कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यांची उपस्थिती हाच त्यांच्यासाठी मोठा सन्मान असल्याचे, ते म्हणतात. अशा या जनजातींच्या संस्कृतीचे संवर्धक दामोदर थाळकर यांना पुढील वाटचालीसाठी आणि त्यांच्या कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा!

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक