सुडाचे नव्हे, अभिमानाचे हिंदुत्व

    01-Jan-2025   
Total Views |
 
Hinduism
 
जुलमी दुष्ट जेत्याने जितावर लादलेल्या अपमानाचा घेतला गेलेला, ऐतिहासिक सूड होता. मोदी-शहा यांचे हिंदुत्व हे सुडाचे नाही, तर समस्त हिंदूंसाठी अभिमानाचे हिंदुत्व आहे.
 
मोदी-शहांचे हिंदुत्व सुडाच्या शाईने लिहिलेले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आजपर्यंतच्या त्यांच्या विधानामध्ये एक वाक्य काय ते खरे बोलले, बरोबर आहे त्यांचे. हिंदुत्व सुडाचे आहे, म्हणूनच तर आज भारतातल्या बहुसंख्य हिंदूंना सुरक्षित वाटत आहे. त्यामुळेच तर 500 वर्षे अडगळीत पडलेल्या, रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यामुळेच तर अफजलखानाची कबर उकरली गेली आणि त्यामुळेच इंग्रजांच्या काळातले बिनकामाचे कायदेही बदलले गेले. यामुळेच तर मुघल आणि इंग्रजांच्या जुलमी राजवटीचे सत्य घराघरात पोहोचले आणि त्यांना टक्कर देत स्वातंत्र्य मिळवणार्‍या, धर्म टिकवणार्‍या बहाद्दरांचा इतिहासही ज्ञात झाला. हा सूड कोत्या मनाच्या आणि खुरट्या बुद्धीचा स्वार्थी सूड नव्हता. तर जुलमी दुष्ट जेत्याने जितावर लादलेल्या अपमानाचा घेतला गेलेला, ऐतिहासिक सूड होता. मोदी-शहा यांचे हिंदुत्व हे सुडाचे नाही, तर समस्त हिंदूंसाठी अभिमानाचे हिंदुत्व आहे.
 
अर्थात, हा सूड समजण्याची मानसिकता सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्यामधे नसावीच. कारण धर्म, देश, समाज, मन यांपेक्षा त्यांना आपले वीसच आमदार कसे बरे निवडून आले, याची खंतच जास्त आहे. कारण, प्रश्न सत्तेचा आहे. सत्ताच नसेल तर? कळायला लागले, तेव्हापासून त्यांनी सत्ताकेंद्राची ताकद पाहिली होती. पितृछत्र हरपल्यावर वांद्—याच्या ‘मातोश्री’चे सर्वार्थाने चालणारे सत्ताकेंद्र त्यांनी हातात घेण्याचा प्रयत्न केला. पण, ते काही साध्य झाले नाही. मात्र, त्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून, सत्ता उपभोगली. सत्ता आली आणि अचानक गेलीही. मात्र, सत्तेच्या कैफाची चव चाखल्यानंतर सत्तेबाहेर राहणे, भल्याभल्यांना जमत नाही. उद्धव ठाकरे ही अपवाद नाहीतच. या सगळ्या धुमश्चक्रीत त्यांनी काँग्रेसची जी मानसिकता आहे, त्याच मानसिकतेतून हिंदू आणि महाराष्ट्राचा विचार करायला सुरुवात केली. मराठी माणसाला चुचकारण्यासाठी, इतर प्रांतांतल्या लोकांना लक्ष्य करण्याचे प्रयत्नही झाले. प्रांतवादाला खतपाणी करण्याचे सुरू झाले. तर, हिंदू अस्मितेचा जागर करणार्‍या प्रत्येक घटना आणि घटकापासून ते दूर गेले. या सगळ्या प्रकरणाबद्दल लोकांचे म्हणणे आहे की, मोदी-शहांचे हिंदुत्व सुडाच्या शाईने लिहिले आहे. पण, लिहिण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडचे हिंदुत्व शाबूत ठेवले आहे. उठासाहेब तुमच्याकडे नावाला तरी हिंदुत्व आहे का?
 
परदेश वारीत मस्त
 
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधी अत्यंत दुःखाने म्हणाले, मी माझा मेन्टॉर गमावला. मात्र डॉ. मनमोहन सिंग मेन्टॉर आहेत असे म्हणून, दुसर्‍याच दिवशी राहुल गांधी व्हिएतनामच्या दौर्‍यावर गेले. बरं, राहुल गांधी काय जागतिक स्तराचे नेते, अधिकारी, विचारवंत की कार्यकर्ते आहेत? कुणीच नाही. काँग्रेसच्या नेत्यांच्या मते, तो त्यांचा खासगी दौरा आहे.
 
अर्थात कोणी कुठे जावे, काय करावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण जनतेला मूर्ख समजून, खोटे खोटे दुःख राहुल गांधी यांनी का बरं दाखवले असेल? मुळात डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल राहुल यांना किती आदर होता, हे सगळ्या जगाने पाहिले होते. ती अत्यंत संतापजनक घटना असल्याने टाळता येत नाही. डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदी असताना, अध्यादेश पारित केला होता. पण राहुल गांधीनी तो अध्यादेश टराटरा फाडून टाकला. पंतप्रधान सोडा, पण पक्षातली ज्येष्ठ अभ्यासू व्यक्ती आहे, असे चुकूनही राहुल यांना वाटले नव्हते. तर राहुल गांधी डॉ. मनमोहन सिंग यांना अशा प्रकारे मेन्टॉर मानत होते. चारचौघात डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी वागण्याची ही तर्‍हा असेल, तर बंद दाराआड राहुल डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी कसे वागत असतील, हा संशोधनाचाच विषयच होईल.
 
बाकी, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याशी सुद्धा काँग्रेस कशी वागली, हेसुद्धा जगजाहीर आहे. काँग्रेसचे नेते काहीही म्हणोत, पण देशाचा विरोधी पक्षनेता त्याच्याच पक्षातल्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर डायलॉगबाजी करत विदेशात फिरायला जातो, हे काही संवेदनशीलतेचे चित्र नाही. ज्या डॉ. मनमोहन सिंगांनी सत्ताकाळ राबवला, पंतप्रधान असूनही गांधी घराण्याचे म्हणणे डावलले नाही, त्या मनमोहन सिंगांच्या मृत्यूबाबत राहुल गांधी यांचे वागणे हे असे आणि अशीच भावना आहे, तर मग त्यांच्या काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांबाबत त्यांच्या मनात काय भावना असेल हे न सांगताही कळते. राहुल गांधींच्या मते, कार्यकर्त्यांचा जन्म केवळ गांधी घराण्यासाठी खपणे, राबणे यांसाठीच झाला आहे, असेच असावे. त्यामुळेच, तर डॉ. मनमोहन सिंगांच्या मृत्यूनंतरच्या शोककाळातही ते असे परेदशवारीत मस्त आहेत.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.