ई-कॉमर्सचा बदलता ट्रेंड

    01-Jan-2025   
Total Views |
 
e-commerce
 
पूर्वी ऑनलाईन वस्तू खरेदी हा चैन आणि स्टेटसचा विषय होता. कपड्यांपासून ते मोबाईलपर्यंत, प्रत्येक गोष्ट या प्लॅटफॉर्मवर एका क्लिकवर उपलब्ध होत होती. मात्र, ऑर्डर केल्यानंतर वस्तू पोहोचण्यासाठी किमान तीन ते चार दिवसांचा अवकाश असे. हा कल आता दहा मिनिटांत वस्तू घरपोच मिळविण्याच्या अ‍ॅप्समुळे बदलू लागला आहे.
 
भारतात ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ या दोन कंपन्यांनी ई-कॉमर्स क्षेत्राचा पाया रचला खरा, पण त्यांच्या सवंगडीला ‘मिंत्रा’, ‘आजिओ’, ‘ब्लिंककीट्स’ यांसह अनेक कंपन्यांनी स्वत:ची जागा निर्माण केली. सुरुवातीला अगदी शहरी भागात असलेली या कंपन्यांचची सेवा आता गावाखेड्यापर्यंत जाऊन पोहोचली. ‘फोर-जी’ आणि ‘फाईव्ह-जी’चे जाळे जसजसे विस्तारत गेले, तसतसे या सेवा उपलब्ध होऊ लागल्या. कोविड काळात ग्राहकांकडे बरासचा वेळ असल्याने, या सेवांच्या विस्तारासाठी प्रामुख्याने कोरोना काळातील दोन टप्पे महत्त्वाचे ठरलेे. ओटीटी, फूड डिलिव्हरी अ‍ॅप्ससह अन्य सेवा देणार्‍या कंपन्यांनाही, आपला विस्तार ’आपदा में अवसर’ शोधत केला. वेगवान घरपोच देणार्‍या कंपन्यांना, काही मिनिटांत सेवा पोहोचविणारी बाजारपेठ उपलब्ध आहे, हे लक्षात आले आणि अत्यावश्यक सेवा देणार्‍या वस्तूंचाही पुरवठा याच डिलिव्हरी अ‍ॅपमार्फत होऊ लागला. ज्यावेळेस या क्षेत्राचे अवलोकन केले जाईल, तेव्हा कोरोनापूर्व, कोरोनाकाळ आणि कोरोनानंतरचा काळ असे तीन टप्पे वर्गीकृत केले जातील. या क्षेत्रातही कोरोनाकाळानंतर होत असलेली वाढ लक्षात घेता, बदलता ट्रेंड दिसू लागतो.
 
यंदाच्या वर्षी भारतीयांनी किराण्याशिवाय ऑनलाईन डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे, मेकअप किट्सपासून व्हॅक्यूम क्लिनरपर्यंत गरजेच्या वस्तू मागविल्या. भारतीय सण साजरे करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. त्यामुळे गेल्या वर्षीही सणासुदीच्या काळात, त्या संदर्भातील वस्तूंची मागणी दहा मिनिटांत वस्तू घरपोच सेवा देणार्‍या अ‍ॅप्सवर वाढत गेली. ’हाऊ इंडिया स्वीगीड 2024-क्विक कॉमर्स’ने प्रकाशित केलेल्या अहवालात, याबद्दल अधिक उहापोह करण्यात आला आहे. ‘स्वीगी इन्स्टामार्ट’ देशभरातील 54 शहरांत सेवेत आहे. इथेच सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अन्य आवश्यक गोष्टींची पूर्तता केली जाते.
 
यात दिल्ली आणि देहरादून ही दोन शहरे आघाडीवर आहेत. इथल्या ग्राहकांनी तब्बल वीस लाखांच्या आसपास ऑनलाईन ऑर्डर दिल्या आहेत. दूध, दही, डोसा पीठ, चिप्स, शीतपेये, भाज्या, फळे यांची ऑर्डर देण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे. पाळीव प्राण्यांसाठी ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यात, एक मुंबईकर आघाडीवर आहे. त्याने आपल्या पाळीव प्राण्यासाठी 15 लाखांहून अधिक रकमेच्या ऑर्डर ऑनलाईन केल्या आहेत. चेन्नईतील एका ग्राहकाने तब्बल सव्वा लाखांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑर्डर केल्या आहेत. हैदराबादच्या एका ग्राहकाने तर 35 हजारांचे फक्त आंबेच मागवले. हा बदलता ट्रेंड समजून घेतल्यास ही बाजारपेठ किती मोठी आहे, हे लक्षात येईल. मोबाईल आता जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या खिशात पोहोचला आहे. इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. 2025 या वर्षात पदार्पण करताना, या गोष्टींसाठी आणखी मोठा आशेचा किरण दिसू लागला आहे. आपण मुंबईचा जरी विचार केला, तरीही लक्षात येईल की, गल्लोगल्लीत छोटी-मोठी दुकाने थाटलेली आहेत. गावखेड्यातील बारापेठांपर्यंत रस्ता पोहोचल्यानंतर, दुकानांमध्ये वस्तू उपलब्ध होऊ लागल्या आहेत. तरीही हा बदलता ट्रेंड घरबसल्या वस्तू ऑर्डर करणे, रिव्ह्यू पाहाणे, दोन उत्पादनांची तुलना करणे या सर्व गोष्टींची सोय असल्याने, डिजिटल युगातील ग्राहक हा त्याकडे वळत गेला. कालांतराने प्राईम मेंबरशीपसारख्या सोयी दिल्यानंतर, एका दिवसांत डिलिव्हरीचा ट्रेंड दिसू लागला. त्यासाठी कंपन्यांनी वार्षिक शुल्क योजनाही सुरू केल्या.
 
‘झॉमेटो’ आणि ‘स्वीगी’ कंपन्यांच्या काही मिनिटांत खाद्यपदार्थ पोहोचविण्याच्या स्पर्धेत कालांतराने जीवनावश्यक वस्तूंची विक्रीही सुरू झाली. दहा मिनिटांत वस्तू घरपोच या सेवेमुळे, ग्राहकांनाही झटपट ऑर्डर करण्याची सवय लागली. यातलाही एक पॅटर्न समजून घेण्यासारखा आहे. सकाळी 4 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत या घरपोच वस्तू पोहोचवणार्‍या अ‍ॅप्सच्या ग्राहकांचा दूध, अंडी आणि भाज्यांची ऑर्डर देण्याकडे कल असतो. सायंकाळी जसे जेवण होईल, तसे आईसक्रीम, शीतपेय, चिप्स मागविण्याचा सपाटा असतो. हा ट्रेंड पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू असतो. सॅनिटरी पॅड्स, गोळ्या, औषधे अशा गोष्टी, तर दैनंदिन जीवनाचा भागच. मात्र, जसजसे ऋतुमान बदलत जाईल, तसे हा कलही बदलत जातो. पावसाळा, थंडीच्या वेळेतही गोळ्या, औषधे मागविणार्‍यांचे प्रमाण अधिक असते. सणासुदीच्या काळात तर ही गती आणखी वाढत जाते. अहमदाबादच्या एका ग्राहकाने, 8 लाख 32 हजारांची सोन्याची नाणी विकत घेण्याचा विक्रम रचला आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर नवी झाडू विकत घेण्याची परंपरा! या दिवशी 45 लाख रुपयांच्या झाडूंची विक्री झाली. भावाबहिणीचा रक्षाबंधनाचा सण पाहिला, तर तब्बल आठ लाख राख्यांची ऑनलाईन विक्री झाली. दुसर्‍या दिवशी अडीच लाख राख्या अशा एकूण साडेदहा लाख राख्यांची विक्री झाली. याच दिवसांत प्रत्येक मिनिटाला 273 चॉकलेट्स विकले गेले होते. गेल्या वर्षात 2 लाख, 73 हजार टुथब्रश ऑनलाईन विकले गेले.
 
इतक्या अवाढव्य आकाराच्या ऑर्डर्स पोहोचविणार्‍या यंत्रणाही, तितक्याच सुसज्ज आहेत. याची जबाबदारीही इथेच काम करणार्‍या गीग कर्मचार्‍यांच्या खांद्यावर होती. कोचीतील एका डिलिव्हरी कर्मचार्‍याने, केवळ 89 सेकंदांत 180 मीटर अंतर कापत फळे घरपोच पोहोचविली होती. पूर्वी किराणामालाची यादी करण्याचा प्रकार होता, काही भागांत तो आजही आहे. नंतर सुपरमार्केट्समधून हाताला दिसेल ते घेण्याचा प्रकार सुरू झाला. आठवडी बाजाराची संकल्पना आजही बर्‍याच गावांत आहे. मात्र, शहरांमध्ये रविवारी सुपरमार्केट्समध्ये हा प्रकार प्रामुख्याने दिसला. पैसे भरताना होणारी गर्दी, सामान ने-आण करण्यासाठी लागणारा वेळ हा बर्‍याचशा ग्राहकांना नकोसा वाटतो. संपूर्ण मॉल फिरून हव्या त्या गोष्टी हाती न लागण्याचा अनुभव तर वेगळाच. त्यामुळे ऑनलाईन ऑर्डर करण्याचा पर्याय हा अनेकांना सोयीचा वाटला. या क्षेत्रातही सुधारणेला, व्यवस्था निर्माण करायला अद्यापही वाव आहे. ऑनलाईन वस्तू खरेदी ही ऑफलाईन बाजारपेठांसाठी स्पर्धा म्हणून आजही पाहिली जाते. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी दहा मिनिटांत डिलिव्हरी हा पर्याय सर्वोत्तम ठरेल. दुकानांसाठी ऑनलाईन मंचाची द्वारे खुली करून, देण्याची मोहीम जितक्या लवकर शक्य होईल तितकी करून दिली, तर दहा मिनिटांत डिलिव्हरी ही दोहोंसाठी फायदेशीर ठरणार, हे निश्चित. उत्पादनांचा गुणात्मक आणि संख्यात्मक पैलूंचा विचार केला, तर यात काहीच अशक्य नाही.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.