नॉर्वेच्या नैऋत्य किनार्यालगतच्या खाडीत शनिवार, दि. 31 ऑगस्ट रोजी ‘ह्वाल्दिमीर’ नावाचा बेलुगा व्हेल (देवमासा) मृतावस्थेत आढळून आला. ‘मरीन माइंड’ या संस्थेच्या सदस्यांना ‘ह्वाल्दिमीर’चा मृतदेह पाण्यात तरंगताना सापडला. या संस्थेच्या सदस्यांनी अनेक वर्षांपासून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. हा देवमासा रशियाचा गुप्तहेर म्हणून नॉर्वे आणि जगभरात प्रसिद्ध झाला होता. परंतु, ‘ह्वाल्दिमीर’ या नावाने ओळखल्या जाणार्या देवमाशाला गोळ्या घालण्यात आल्याचे प्राणी हक्क गटांचे मत आहे. हे गट नॉर्वेजियन पोलिसांना तपास करण्याची आणि खरोखर काय घडले, हे शोधण्याची विनंती करत आहेत.
हा मासा पहिल्यांदा 2019 मध्ये नॉर्वेच्या किनार्यावर दिसून आला होता. नॉर्वेच्या सुदूर-उत्तर फिनमार्क प्रदेशात ‘ह्वाल्दिमीर’चा शोध लागला. त्याच्या अंगावर एक विशेष हार्नेसआढळून आल्यामुळे या प्राण्याबाबत खूप उत्सुकता निर्माण झाली होती. समाजमाध्यमे आणि इंटरनेटवरील अनेकांचा असा विश्वास होता की, या देवमाशाला लष्करी हेतूने प्रशिक्षित केले गेले आहे. या हार्नेसवर ‘ईक्वीपमेन्ट सेंट पीटर्सबर्ग’ असे लिहिलेले होते, ज्यामुळे लोकांना वाटले की, हा मासा कदाचित रशियाशी संबंधित असावा. अनेकांचा असा विश्वास होता की, हा देवमासा रशियन लष्करी कार्यक्रमातून पळून गेला होता आणि त्याला रशियन नौदलासाठी कार्ये पार पाडण्यासाठी प्रशिक्षित केलेले असू शकते.
मात्र, रशियाने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. याच संशयामुळे काही लोक त्याला ‘स्पाय व्हेल’ म्हणू लागले. परंतु, स्थानिक सागरी जीवशास्त्रज्ञांनी त्याचा हार्नेस काढून टाकल्यानंतर, ‘ह्वाल्दिमीर’ नॉर्वेजियन पाण्यात मुक्तपणे राहू लागला. त्याच्या मैत्रीपूर्ण वर्तनामुळे आणि अनाकलनीय पार्श्वकथेमुळे नॉर्वेमधील बरेच लोक त्याचे चाहते झाले होते. तो एक स्थानिक ‘सेलिब्रिटी’च बनला होता. सुरुवातीला, त्याचा मृत्यू कसा झाला, हे कळू शकेल अशी कोणतीही स्पष्ट चिन्हे नव्हती. परंतु, काही प्राणी हक्क संघटनांना त्याच्या अंगावरील जखमा आढळून आल्या. यामुळे ‘ह्वाल्दिमीर’ला गोळ्या घालून ठार मारण्यात आले असावे, अशी शक्यता नाकारता येत नाही. या जखमा पाहिल्यानंतर, ‘वन व्हेल’ने नॉर्वेजियन पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि त्यांना गुन्हेगारी तपास सुरू करण्याची विनंती केली. ही परिस्थिती धक्कादायक असून आणि त्वरित तपासाची मागणी करण्यात आली आहे. या प्राणी हक्क संघटनांचा असा विश्वास आहे की, ‘ह्वाल्दिमीर’ची हत्या जाणूनबुजून केलेल्या हिंसाचारात झाली असावी.
सामान्यतः बेलुगा व्हेल समुद्रात 40 ते 60 वर्षे जगू शकतात. पण, ‘ह्वाल्दिमीर’ अंदाजे 15 ते 20 वर्षांचा असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या अंगावर असलेल्या जखमांपैकी काही जखमा सागरी पक्ष्यांमुळे उद्भवू शकतात. परंतु, इतर चिन्हे अद्याप अस्पष्ट आहेत. ‘ह्वाल्दिमीर’चा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी नॉर्वेजियन पशुवैद्यकीय संस्थेच्या अधिकृत अहवालाची वाट पाहावी लागणार आहे. ‘व्हेटर्नरी इन्स्टिट्यूट’ देवमाशाच्या मृतदेहाची तपासणी करण्यासाठी आणि त्याचा मृत्यू कसा झाला, हे शोधण्यासाठी शवविच्छेदन करणार आहे. शवविच्छेदनाचे निकाल सुमारे तीन आठवड्यांत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. या अहवालावरून ‘ह्वाल्दिमीर’चा मृत्यू बंदुकीच्या गोळीबाराने झाला की इतर कशामुळे झाला, हे स्पष्ट होऊ शकेल.
‘ह्वाल्दिमीर’ हा काही सामान्य देवमासा नव्हता. तो अनेकदा बोटींपर्यंत पोहताना, मच्छिमारांशी संवाद साधताना आणि पाण्यात पडलेल्या वस्तू बाहेर काढताना दिसून आला होता. मानवी सहवासाचा आनंद लुटणार्या प्राण्याचे ते एक दुर्मीळ उदाहरण होते. त्याच्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे आणि दुःखही झाले आहे. ‘ह्वाल्दिमीर’च्या मृत्यूची चौकशी सुरू असताना, जगभरातील लोक उत्तरांच्या प्रतीक्षेत आहेत. त्याला रशियन सैन्याने प्रशिक्षित केले असेल किंवा नसेल, ‘ह्वाल्दिमीर’ची कहाणी एक दुःखद कथा म्हणून कायम लक्षात ठेवली जाईल. प्राणी हक्क संघटनांना आशा आहे की, ‘ह्वाल्दिमीर’ला न्याय दिला जाईल आणि त्याच्या मृत्यूमुळे भविष्यात इतर सागरी प्राण्यांना अधिक संरक्षण मिळू शकेल.