नवी दिल्ली : दुष्काळात होरपळणाऱ्या झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावी या देशांना भारताने मदतीचा हात पुढे करत,अन्नपुरवठा करण्याचा निर्धार केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया पोस्ट द्वारे या संदर्भात माहिती दिली आहे.
१००० मेट्रिक टन तांदूळ, भारताच्या न्हावा शेवा बंदरावरून झिम्बाब्वे साठी रवाना झाले असून, यामुळे झिम्बाब्वेच्या लोकांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण होण्यात मदत होईल अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.त्याच बरोबर, झांबिया या देशासाठी १३०० मेट्रिक टन मका, तर मलावी या देशासाठी १००० मेट्रिक टन तांदूळ देखील भारताकडून पाठवण्यात आले आहे. यामुळे, अन्न सुरक्षेच्या आणि पौष्टिकतेच्या गरजा पूर्ण होतील. विवंचनेत असलेल्या या देशांना मदतीचा हात पुढे करत, भारताने वसुधैव कुटुंबकम या संस्काराची आठवण करुन दिली आहे.
"चाड" साठी संजीवनी
आफ्रिकेतील चाड या देशातल्या राजधानीतल्या एका शस्त्रागाराला भीषण आग लागली असून, त्यात ९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत, व ४६ जणं जखमी आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताने २३०० किलोचं वैद्दकीय सहाय्य चाड या देशाला पुरवले आहे.यामध्ये अत्यावश्यक जीवन-रक्षक प्रतिजैविकं आणि सामान्य औषधांचा समावेश आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.