पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मागणीला यश; गणेशोत्सवानिमित्त मेट्रोच्या वाढीव फेऱ्या

    09-Sep-2024
Total Views |
ganesh festival minister mp lodha
 

मुंबई :   गणेश उत्सवात नागरिकांचे प्रवासात हाल होऊ नयेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीएला केली होती. त्या अनुषंगाने नागरिकांसाठी रात्रीच्या वेळेत अधिक फेऱ्या आणि विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.


दि. ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री ११ ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल. गणेशोत्सवात रात्री उशीरापर्यंत सहभागी झालेल्या भाविकांना आपापल्या घरी पोहोचता यावे, हा या विस्तारित सेवेचा उद्देश आहे.

मंत्री लोढा म्हणाले "महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळांचे सुंदर देखावे पाहण्यासाठी भक्त रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरतात. २४ तास सुरु असलेल्या मुंबईमध्ये भक्तांची घरी जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही मेट्रो सेवेच्या वेळेत आणि फेऱ्यांमध्ये बदल केले आहेत. या वाढीव फेऱ्यांमुळे गर्दी विभागली जाण्यास मदत होईल, सुव्यवस्था राखली जाईल आणि प्रत्येकाला सणाचा आनंद घेता येईल.


विस्तारित सेवांचा तपशील:

अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली टर्मिनल्सवरून शेवटच्या ट्रेनची वेळ ३० मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे.

दोन्ही टर्मिनल्सवरून अतिरिक्त मेट्रो ट्रेन रात्री ११.१५ आणि ११.३० वाजता सुटतील.

गुंदवली ते दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) ते दहिसर (पूर्व) या स्थानकांदरम्यान चार वाढीव फेऱ्या सुरु केल्या जातील.
 
या विस्तारामुळे प्रमुख स्थानकांवर एकूण २० अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील. या वाढीव फेऱ्यांचा तपशील खालीलप्रमाणे:

१. गुंदवली ते अंधेरी (पश्चिम): रात्री १०:२०, १०:३९, १०:५० आणि ११ वाजता (४ सेवा)

२. अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली : रात्री १०:२०, १०:४०, १०:५० आणि ११ वाजता ( ४सेवा)

३. गुंदवली ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२सेवा)

४. अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२सेवा)

५. दहिसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम : रात्री १०:५३, ११:१२, ११:२२ आणि ११:३३ वाजता (४सेवा)

६. दहिसर (पूर्व) ते गुंदवली : रात्री १०:५७, ११:१७, ११:२७ आणि ११:३६ वाजता (४सेवा)