भांडुप : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना अधिक प्राधान्य देणाऱ्या मूर्तीकारांच्या आजच्या काळात भांडुप येथील चित्रशिल्प कार्यशाळेचे आजही पर्यावरणपुरक ‘कागदी’ मूर्त्यांनाच अधिक प्राधान्य देतात. मूर्तिकार भूषण कानडे आणि त्यांचे बंधू कल्पेश कानडे या कार्यशाळेचे काम पाहतात. दरवर्षी या कार्यशाळेत १५० ते २०० च्या आसपास कागदी मूर्त्या तयार होतात. या वर्षी सुद्धा त्यांच्या कारखान्यात १७५ कागदी मूर्त्या तयार केल्या गेल्या. तयार केलेल्या मूर्त्या शिल्लक राहू नयेत आणि त्यासाठी खर्च झालेली मेहनत आणि पैसा वाया जाऊ नये म्हणून यावर्षीही कानडे बंधूंनी ग्राहकांच्या मागणीनुसारच मूर्त्या तयार केल्या आहेत. यावर्षीही मुंबईत, कोकणात आणि प्रदेशातही काही ठिकाणी गणपती पाठवले आहेत.
चित्रशिल्प ही कानडे बंधूंची वडीलोपार्जित कार्यशाळा आहे. भूषण कानडे आणि कल्पेश कानडे गेल्या वीस-बावीस वर्षांपासून या कार्यशाळेचे काम स्वत: पाहत आहेत. कानडे बंधू स्वत: पर्यावरणप्रेमी आहेत त्यामुळे इतर पर्यावरणप्रेमींना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता यावा म्हणून त्यांनी की कागदी गणपती तयार करण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. हे गणपती तयार करण्यासाठी ते जुन्या वर्तमानपत्रांचा वापर करतात. जुन्या वर्तमानपत्रांचा लगदा तयार करून त्यात डिंक आणि खडूचा भुसा मिसळला जातो. हे मिश्रण काही दिवस साच्यात ठेवले जातात आणि मग त्यापासून गणपती तयार केले जातात. एक फुटाचा कागदी गणपती तयार करण्यासाठी कानडे बंधूंना साधारण ७ ते ८ दिवसांचा वेळ लागतो. “आमची ही वडीलोपार्जित कार्यशाळा ७० वर्षे जुनी आहे. कागदी गणपती तयार करणे हे पीओपी आणि शाडू मातीच्या तुलनेत अधिक खर्चीक असते आणि त्यामुळे इतर ठिकाणी त्यांची विक्री किंमतही जास्त असते. पण पर्यावरणप्रेमींना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता यावा त्यामुळे आम्ही त्यांना हे गणपती मुबलक दरात देतो.” अशी माहिती मूर्तिकार भूषण कानडे यांनी दिली.