हिंदू-बौद्ध ऐक्याचा निर्धार!

    09-Sep-2024   
Total Views |
article on adv vijay gavhale


“देशाच्या सुरक्षिततेसाठी हिंदू आणि बौद्ध समाज कायम अग्रेसर असणार आहे. दोन्ही समाजाच्या समन्वयासाठी काम करणार,” असा निर्धार व्यक्त करणार्‍या अ‍ॅड. विजय गव्हाळे यांच्या जीवनाचा मागोवा...

बौद्ध समाजाचे गव्हाळे कुटुंब मूळचे घोडेगाव, नगर जिल्ह्यातले. मात्र, पुढे बारामतीमध्ये स्थायिक झाले. लक्ष्मण गव्हाळे आणि त्यांची पत्नी अनसुयाबाई. अनसुया या मातंग समाजाच्या. या दाम्पत्याला चार मुले. त्यांपैकी एक विजय. लक्ष्मण हे तसे बेदरकार प्रवृत्तीचे. त्यांचा हातभट्टीच्या दारूचा धंदा होता. मारामार्‍या, भांडणे हे नित्याचेच. त्यामुळे पोलिसांच्या कायमच ‘हिट लिस्ट’वर ते कायम असत. दारू प्यायल्यावर लक्ष्मण पत्नी-मुलांना भरपूर जाच करत. यातच त्यांना तडीपारीची शिक्षा झाली. दारूचा गुत्ता बंद पडला. पाचवीत शिकत असलेल्या विजयला, त्याच्या भावंडांना आणि आईला उपासमारीची वेळ आली. त्यामुळे विजय एका मुसलमान कुटुंबाकडे रोजंदारीवर काम करू लागले. एकदा घरातल्या बाईने शेण भरून आणायला पाठवले. विजय यांनी गाडाभर शेण भरून आणले. इतक्यात घरातल्या बेगमसाहेबांनी आवाज दिला, “ए पोरा, कल से मत आना. तू माझ्या म्होरं ताठ मानेने चाललास. नोकराने कसं वाकून, झुकून चालायचं.” 12 वर्षांच्या विजयच्या हातातले काम सुटले आणि उपासमार वाढू लागली. बरे, गावात लक्ष्मण यांच्या भीतीने आईला कोणीही कामावर ठेवत नसे.

दरम्यान, एका वर्षाने वडिलांची तडीपारी संपली. ते पुन्हा आले आणि पुन्हा जाच सुरू झाला. आई वैतागून दोन छोट्या बहिणींना घेऊन पुण्याला माहेरी गेली. इथे विजय आणि मोठ्या बहिणीला ठेवून गेली. मात्र, बौद्ध व्यक्तीशी विवाह केला, म्हणून माहेरच्यांनी तिला घरात घेतले नाही. ती स्वारगेटला भीक मागू लागली. हे कळल्यावर विजय आणि छोटी बहीण बापाच्या नकळत पुण्याला गेले. कसेबसे आई, बहिणीला शोधून काढले. भीक मागू नको, म्हणून आईला विनंती केली. चारच दिवसांत बाप पुण्यात आला आणि सगळ्यांना घेऊन बारामतीमध्ये आला. पण, दिवस काही बदलत नव्हते. या सगळ्यात एक विरंगुळा, मनाचे समाधान होते, ते म्हणजे विजय यांना वाचनाची आवड निर्माण झाली. या काळात भंडारी नावाच्या संघ स्वयंसेवकाने विजय यांना शैक्षणिक साहित्य मिळवून दिले.

आज तेच विजय गव्हाळे शहरातील आंबेडकरी चळवळीचा प्रमुख चेहरा आहेत. बौद्ध युवक संघाच्या माध्यमातून ते सहावेळा अपक्ष नगरसेवक झाले. प्रमुख विरोधी पक्षनेताही झाले. आपल्या चळवळीतील आठ मित्रांनाही नगरसेवक म्हणून निवडून आणले. सध्या विजय नगरसेवक नाहीत किंवा कोणत्याही राजकीय पदावर नाहीत. मात्र, महाराष्ट्रभर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय आणि प्रगतिशील विचारांचा, संविधानाचा जागर करत आहेत. हिंदू आणि बौद्ध समाजाच्या ऐक्यासाठी कार्य करत आहेत.

त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. त्याचीही व्यथा-कथा आहे. ते महाविद्यालयात असताना कुलकर्णी नावाचे संघ स्वयंसेवक त्यांच्या घरी अचानक आले. विजयशी मैत्री केली. त्यावेळी विजय यांना ज्युदो, कराटे शिकण्याची हौस होती. पण, पैसे नव्हते. कुलकर्णी यांनी विजय यांना विनामूल्य प्रशिक्षण घेण्याची व्यवस्था केली. विजय यांनी प्रशिक्षण घेतले आणि महाविद्यालयात शिकत असतानाच प्रशिक्षक म्हणूनही काम करू लागले. तो दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे लक्ष्मण यांनी अनसुयाबाईंना खूप मारहाण सुरू केली. कोणीतरी विजय यांना हे सांगितले. विजय यांना संताप अनावर झाला. लहानपणापासून आईचा त्रास त्यांनी पाहिलेला होता. भूक, उपासमार, असाहाय्यता सारे एका क्षणात डोळ्यांसमोर उभे राहिले. असह्य होऊन त्यांनी बापाला अडवले. राग अनावर झाला होता. मात्र, कोणावर हा राग काढणार? रागाच्या भरात त्यांनी गावातल्या सगळ्या गुंडांनाच बदडून काढले.

चौकातल्या गल्ली-बोळातल्या सगळ्याच गुंडांना मारले. एकाच दिवसात त्यांच्यावर 35 गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी त्यांना पकडले. मात्र, पोलीस अधिकारी म्हणाले, “याआधी तुझ्यावर एकही गुन्हा नाही. पण, काल एकाच दिवसात तुझ्यावर मोजून 35 गुन्हे दाखल झाले. ज्यांना तू मारलेस, ते सगळे खतरनाक गुंड होते. पंचक्रोशीतला सगळा समाज तुझ्यासाठी पुढे आला आहे.” समाजाने पुढाकार घेत विजय यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. तुरुंगातून सुटल्यावर विजय यांनी ठरवले की, आपण आपल्या शक्तीचा आणि उर्जेचा उपयोग समाजासाठी करायचा. त्यांनी त्यांनी शहरातील 500 पेक्षा अधिक युवकांना एकत्रित केले. त्यांना विनामूल्य ज्युदो, कराटेचे प्रशिक्षण दिले. गुरूदक्षिणा एकच मागितली. ती म्हणजे, कोणी कोणावर उगीच अत्याचार करत असेल, अन्याय करत असेल, तर पीडिताला न्याय मिळवून द्यायचा. त्यामुळे शहरात पीडितांना न्याय मिळवून देणारी तरुणाईची शक्ती निर्माण झाली.

असो. नगरसेवक असतानाच विजय यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. बारामतीमध्ये डॉ. बाबासाहेबांचा पुतळा बसवावा, यासाठी 12 वर्षे लढा दिला. नगर परिषदेतर्फे उभ्या राहाणार्‍या स्टेडियमला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव द्यावे, यासाठी लढा दिला. कारण, या स्टेडियमला शरद पवारांच्या मातोश्रींचे नाव द्यावे, असा घाट घातला जात होता, तर राजकारणात, समाजकारणात शक्तिमान असलेल्या बारामतीच्या प्रस्थापितांपुढे जराही न झुकता, विजय यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले आहे. ते म्हणतात, “बाबासाहेब म्हणायचे, आपण सगळे भारतीय आहोत. हे भारतीयत्व अखंड राखण्यासाठी दोन समाज प्रामुख्याने अग्रेसर आहेत, ते म्हणजे हिंदू आणि बौद्ध. त्यामुळे दोन समाजांच्या समन्वयासाठी मी काम करणार आहे. ज्याला जशी भाषा समजते, तशा भाषेत समजावणार आहे.” अ‍ॅड. विजय गव्हाळे यांचे विचारकार्य समाजासाठी दिशादर्शक आहे.


9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.