मुंबई : मुख्यमंत्रीपदासाठी अजून किती लाचार होणार? तुम्हाला खाजगीतही कोणी मुख्यमंत्री म्हणायला तयार नाही, असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शनिवारी सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यात आला. यावरून आता केशव उपाध्येंनी त्यांचा जोरदार समाचार घेतला.
महाविकास आघाडीतले काँग्रेस आणि काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सभा आणि बैठकांमधून ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाहीत, निवडणूका झाल्यावर आमदार मुख्यमंत्री ठरवतील..असे वारंवार सांगूनही लाचारीचा कळस गाठलेला शिवसेना उबाठा ला @SaamanaOnline मधून अशी टीका करावी लागत आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, "महाविकास आघाडीतले काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते सभा आणि बैठकांमधून ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाहीत. निवडणूका झाल्यावर आमदार मुख्यमंत्री ठरवतील, असे वारंवार सांगूनही लाचारीचा कळस गाठलेला शिवसेना उबाठा ला सामना मधून अशी टीका करावी लागत आहे. आधीचे दिवस आठवा, जिथे वरिष्ठ भाजपाचे नेते चर्चेसाठी स्वतः मातोश्री वर यायचे. तुम्हाला मानाचे स्थान असायचे. तुमच्या शब्दाला किंमत होती आणि आता काय?"
"स्वत:च शंभर वेळा उद्धव ठाकरे मुखमंत्रीपदाचा चेहरा असे घोकत आहेत. त्याला भाव देत नाही. काँग्रेसच्या नेत्यांचे दिल्लीत जाऊन उंबरठे झिजवावे लागत आहेत. तिथेही सोनिया गांधी भेटत नाहीत. वर तरीही तुम्हाला खाजगीतही कोणी मुख्यमंत्री म्हणायला तयार नाही. अजून किती लाचार होणार? अजून किती काँग्रेसच्या विचारांची गुलामी करणार? अजून किती दिवस हिंदुत्वाला धोका देणार? आणि अजून लोकांच्या नजरेत किती खाली उतरणार?" असा खोचक सवाल केशव उपाध्येंनी केला आहे.