नैवेद्य म्हणजे काय ? काय आहे गणेशोत्सवातील नैवेद्याचे महत्त्व ? जाणून घ्या सविस्तर....
09-Sep-2024
Total Views |
लाडक्या गणरायाचे घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळात आगमन झाले आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वीपासून केलेली सजावट, आरास तसेच आगमनानंतर स्वागत, पूजा, आरत्या, मंत्र-पुष्पांजली, गोडधोड पदार्थ, धूप-दीपाचा सुगंध यांमुळे सर्वत्र चैतन्यदायी वातावरण निर्माण होते. आपल्या संस्कृतीमध्ये गणरायाची षोडशोपचार पूजा करण्याची परंपरा सांगितलेली आहे. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, नमस्कार, प्रदक्षिणा आणि विसर्जन या अशा सोळा विविध उपचारांनी केलेल्या पूजेस 'षोडशोपचार पूजा' असे म्हणतात.
नैवेद्य म्हणजे काय ?
नैवेद्य हा षोडशोपचार पूजेमधलाच एक महत्त्वाचा विधी आहे. सामान्यत: देवाला दाखवलेला नैवेद्य हाच प्रसाद म्हणून ग्रहण करतात. नैवेद्य वा प्रसाद म्हणजे पूजेनंतर व आरतीच्या आधी भक्तिभावाने देवाला अर्पण केलेला सात्विक खाद्यपदार्थ होय. हाच नैवेद्य नंतर भक्तांमध्ये देवाचा आशीर्वादस्वरूप प्रसाद म्हणून वाटला जातो. देव नैवेद्य प्रत्यक्षात कधीही सेवन करत नाही. परंतु गंध, रस आणि सत्व या रूपाने देव त्या नैवेद्याचा आस्वाद घेतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच देवाला नैवेद्य दाखवण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे.
नैवेद्यासाठी तयार केलेले पदार्थ षडरसांनी युक्त असावेत, असे सांगितले जाते. दूध, साखर ते गूळ-खोबऱ्यापासून पेढे, मोदक, फळे, सुका मेवा आदी आपल्याला जमेल त्या पदार्थांचा नैवेद्य दाखवता येतो. पूर्वीच्या काळी खिरापतीचा नैवेद्य दाखवला जात असे. ‘खिरापती’मध्ये ‘ख’च्या बाराखडीतले सर्व पदार्थ असतात. जसे की खोबरे, खडीसाखर, खसखस, खारीक. त्यामुळेच त्याला खिरापत म्हटले जात असावे. पण प्रसाद म्हणून वाटण्यात येणाऱ्या खिरापतीचा खरा अर्थ मुबलक प्रमाणात खाण्याजोगी वा वाटण्याजोगी वस्तू असा असावा.
गणपती बाप्पाला प्रिय 'मोदक'
आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला उकडीचे मोदक अतिप्रिय आहेत. मोद म्हणजे आनंद, आनंद देणारा हा मोदक. तळलेले मोदक, लाडू यांचाही नैवेद्य बाप्पाला दाखवण्यात येतो. विविध अन्नपदार्थांचा नैवेद्यही बाप्पाला दाखवण्यात येतो. गणेशचतुर्थीच्या दिवशी एका ताटात वा केळीच्या पानात त्या दिवशी केलेले सर्व अन्नपदार्थ वाढून त्यांचा नैवेद्य गणपतीला दाखवला जातो. सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांनी युक्त अशा या नैवेद्यास ‘महानैवेद्य’ म्हणतात.
बाप्पाच्या पूजेसाठी फुले, पत्री, दुर्वा, गंध, अक्षता, अगरबत्ती या व अशा अनेक गोष्टी लागतात. पण त्यामध्ये नैवेद्य हा असायलाच हवा! गोडाप्रमाणेच तिखटमीठाच्या पदार्थांचाही नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला प्रवासात खाण्यासाठी शिदोरी बनवून देण्याची पद्धत आहे. या शिदोरीमध्ये खिरापतीच्या पदार्थांसोबतच दहीपोहेही बनवून दिले जातात.