पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये भारताची गगनभरारी !

08 Sep 2024 18:32:51

paris
 
 
पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये यशाचे नवनवीन विक्रम रचत भारताने सुवर्ण कामगिरी केलेली आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण २९ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत १८ व्या क्रमांकावर आहे. भारताने आपल्या कामगिरीने स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया, बेल्जियम आणि अर्जेंटिना या देशांना मागे टाकले आहे.

भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली असून, यापूर्वीचे रेकॉर्ड तोडले आहेत. या आधी भारताने टोकियो पॅरालिम्पिक मध्ये २०२० साली ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदके जिंकली होती.

यावेळी भारताने ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक १७ पदके जिंकली, ज्यात ४ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पॅरा बॅडमिंटन हा खेळ असून, भारताने एका सुवर्ण पदकासह ५ पदकांची कमाई केली आहे. त्याच सोबत, पॅराशूटिंगमध्ये एक सुवर्णा यासह ४ पदके जिंकली.

भारताने पॅरा र्आचरी मध्ये २ पदके जिंकली, तसेच पॅरा ज्युडोमध्ये १ कांस्यपदक जिंकले. पहिल्यांदाच भारताने, इतक्या मोठ्या संख्येने सुवर्णपदकांची कमाई केली आहे.

१९६८ ते २०१६ या कालावधीत भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेत केवळ १२ पदके जिंकली होती. परंतु, मागाच्या दोन पॅरालिम्पिक खेळांमध्ये चारपट अधिक पदकांची कमाई केल्याचे निदर्शनास आले आहे. भारताने टोकियोमध्ये १९ आणि पॅरिसमध्ये २९ पदके जिंकली आहेत, ज्यांची एकूण संख्या ४८ आहे. त्यामुळे, पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची गगनभरारी प्रेरणादायी आहे.
 
पॅरा ॲथलीट मुरलीकांत पेटकर यांनी १९७२ मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले. हे तेच खेळाडू आहेत, ज्यांच्या जीवनावर ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

२०२४ मधील पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये शूटर अवनी लेखरा हीने भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. यानंतर नितेश कुमार (बॅडमिंटन), सुमित अँटील (ॲथलेटिक्स), हरविंदर सिंग (ॲथलेटिक्स), धर्मबीर (ॲथलेटिक्स), प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स) आणि नवदीप सिंग (ॲथलेटिक्स) हे देखील सुवर्ण पदक जिंकण्यात यशस्वी झाले.
 
Powered By Sangraha 9.0