सध्या गणेशोत्सव सुरु झाला असून दीड दिवसांच्या गणरायांना साश्रुनयनांनी भक्तांनी निरोपदेखील दिला. ऋषिपंचमीच्या दिवशी दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन होते. तसेच, शेगावीच्या गजानन महाराजांचा समाधी दिनही साजरा होतो. याठिकाणी चालणार्या मिरवणुकीच्या सोहळ्यात लेझीमचा उपयोग होतो. लेझीम क्रीडाप्रकाराचा हा आढावा...
जे छत्रपतींच्यावतीने कारभार चालवत होते, त्या महाराष्ट्रातल्या पुण्यनगरीचे ते पेशवे. त्यातील सवाई माधवरावांनी, घराघरांतील देवघरात पूजल्या जाणार्या श्री गजाननाला शनिवारवाड्याच्या गणेश महालातील गजाननाच्या पूजेला, आपल्या दरबारातील अनेक मानकर्यांच्या सहकार्याने सामाजिक स्वरुप आणायला प्रारंभ केला. तसे स्वरुप आणायला भाऊसाहेब रंगारी यांसारख्यांनी पुढाकार घेत, त्याला उत्सवाचे स्वरुप देण्यास सुरुवात केली. कालांतराने लोकमान्य टिळकांनी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या त्या गणपती पूजनाला देशप्रेमाचे सार्वजनिक स्वरुप देत, तो उत्सव अनोख्या स्वरुपात आणला. मग तो उत्सव पुणे, मुंबईसारख्या महानगरांपासून, महाराष्ट्रात व देशातील अनेक गावांत त्याचा प्रसार करण्यास सुरुवात केली. तेव्हाच्या काळापासूनच्या काळात ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या घडल्या, त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेशोत्सव!
आपल्या संस्कृतीत ऋषिपंचमीचे खूप महत्त्व असते. गणेश चतुर्थी पाठोपाठच्या भाद्रपद शुद्ध पंचमीला येते त्या पंचमीला, समस्त ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. अशा दिवशी एका ऋषीतुल्य महात्म्याने, विदर्भातील शेगाव येथे आपली अवतार समाप्ती घेतली होती. महाराष्ट्रात अजून एका गजाननाचे शहर टिळकांच्या आसपासच्या काळात विदर्भात उदयाला आले, ते म्हणजे शेगाव. ॥गणी गण गणांत बोते॥ ॠगणख्र म्हणजे, विचार कर किंवा लक्षात घे. ॠगणख्र म्हणजे जीवात्मा. ॠगणांतख्र म्हणजे ब्रह्माहून वेगळा नसलेला, जीव हाच ब्रह्म आहे. ॠबोतेख्र म्हणजे जयजयकार कर. थोडक्यात इंद्रियांच्या समुदायात असणारा जो जीवात्मा आहे, तो ब्रह्माहून वेगळा नाही, त्याचे चिंतन कर, ही शिकवण देणार्या शेगावनिवासी श्री गजानन स्वामी महाराजांच्या अवतार समाप्तीच्या निमित्ताने, समस्त गजाननभक्तांनी रविवारी अर्थात ऋषिपंचमीला त्यांना विनम्र नमन केले. “गणी गण गणांत बोते” असे भजन महाराज अहर्निश करत असत. म्हणूनच लोक त्यांना ‘श्री गजानन महाराज’ म्हणून संबोधू लागले. शिवजयंतीप्रीत्यर्थ अकोल्याला भरवलेल्या एका सभेत, सार्वजनिक गणपती आणि शिवजयंती चालू करणाऱे लोकमान्य टिळक आणि श्री गजानन स्वामी महाराज एकत्रही आले होते. यावर्षी ऋषिपंचमीपूर्वी शनिवार, दि. 7 सप्टेंबर रोजी भाद्रपद शु. चतुर्थीला, गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर प्रारंभ करत दि. 17 रोजीच्या मंगळवारपर्यंत आपण दिमाखात गणेशोत्सव साजरा करायला प्रारंभ केला आहे. प्रथम अशा या दोन्ही गजाननांना आपला दंडवत.
श्री गजानन स्वामी महाराजाना आपले अवतारकार्य संपत आल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी, आपल्या भक्तांना तसे सूचित केले. दि. 8 सप्टेंबर 1910 रोजी ते शेगांवातच समाधीस्थ होताना -
गणेश चतुर्थीचे दिवशीं।
महाराज म्हणाले अवघ्यांसी।
आतां गणपती बोळवण्यासी।
यावें तुम्हीं मठांत॥3॥
कथा गणेशपुराणांत।
ऐशापरी आहे ग्रथित।
चतुर्थीच्या निमित्त।
पार्थिव गणपती करावा॥4॥
त्याची पूजा-अर्चा करुन।
नैवेद्य करावा समर्पण।
दुसरे दिवशीं विसर्जून।
बोळवावा जलामध्यें॥5॥
तो दिवस आज आला।
तो साजरा पाहिजे केला।
या पार्थिव देहाला।
तुम्ही बोळवा आनंदें॥6॥
त्याआधी त्यांचे दर्शन घेण्यास, ऋषिपंचमीला त्यांच्या भक्तांचा अपार मेळा जमला होता. त्यात हजार टाळ जमला होता. त्यांनी गजानन महाराजांची रथातून मिरवणूक काढली. त्याला अपार दिंड्या आल्या होत्या. बायांनी रस्त्यावर गोमयाचे सडे घातले होते. त्या सगळ्यांनी शेगावग्रामात जणू दीपोत्सव साजरा केला होता. रात्रभर वाद्यांचे नाना प्रकार वाजत होते. विठ्ठलाचा नामघोष करत तुळशी, बुक्का, गुलाल, फुले असे उधळत श्री गजानन महाराज फुलांखाली झाकून गेले होते. लोक खिरापती वाटत होते. कित्येकांनी रथावरती रुपये,पैसे उधळले. शेगावी अशी रात्रभर चालणारी मिरवणूक अखेर पहाटे मठात परतली होती. समाधीच्या जागेवरी गजानन महाराजांची सदेहमूर्ती नेऊनी ठेवली. त्या अखेरचा देहाला रूद्राभिषेक करण्यात आला होता. त्यांची पंचोपचार पूजा केली, आरती उजळली. भक्तांनी गजाननाचे नावाचा नामगजर केला.
जय जय अवलीया गजानना।
हे नरदेहधारी नारायणा।
अविनाशरूपा आनंदघना।
परात्परा जगत्पते॥
अशा भजनात त्यांची मूतीर्र् आसनावर उत्तराभिमुख ठेविली. सार्यांनी अखेरचे दर्शन घेतले. ‘जय स्वामी गजानन’ असे म्हणत म्हणत मीठ, अर्गजा, अबीर लावत समाधीस्थळाला शिळा लावली गेली आणि शेवटी द्वार लावून घेतले. दहा दिवसांपर्यंत तेथे समाराधना चालली होती. अशी विस्तृत माहिती श्रीदासगणूविरचित ‘श्री गजानन विजय’ नामक ग्रंथातील एकोनविंशोऽध्यायात आढळते.
गजानन महाराजांनी फक्त विविध चमत्कारच केले नाहीत, तर त्यांची मानसिक आणि शारीरिक ताकद विलक्षण होती. एखाद्याने त्यांना नुसते बघितले असते, तर त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला नसता, अशीच त्यांची देहयष्टी होती. तरीदेखील अनेकांना मल्लयुद्धात त्यांनी पराभूत करुन, त्यांना आपलेसे करुन घेतले होते. योगसाधनेत ते निष्णात होते. असा उल्लेख आधुनिक महिपतीचा अवतार असलेल्या, हभप दासगणूमहाराजरचित ‘श्री गजानन विजय’ ग्रंथात आढळतो. त्याच ग्रंथात गजानन महाराजांच्या अवतार समाप्तीचा वरील उल्लेखही आढळतो.
‘गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला,’ असे म्हणत दीड दिवसाच्या गणपतीची बोळवण करताना, आपल्या मनात जसे भाव येतात, त्याहून उत्कट भाव त्यावेळी शेगावकरांच्या मनात उचंबळून आले असतील. कोणाच्या मनात गौरीगणपतीला निरोप देण्याच्या दिवशी, तर कोणाच्या मनात अनंत चतुर्दशीलादेखील हेच विचार नक्की येत असतील.
गणेशोत्सवात मानाच्या गणपतींची मिरवणूक आपण जशी काढतो, त्यासारखी गजानन स्वामी महाराजांची जंगी यात्रा, महाराज समाधीस्थ होण्याआधी समस्त शेगावकरांनी काढली होती. त्याप्रसंगी पंचक्रोशीतील जनसमुदाय लोटला होता. गुलालाची उधळण करत ,त्या गजाननाची मिरवणूक काढली होती. सध्या ऑलिम्पिकचा काळ आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेतील विजेते आपापल्या गावी येतात, तेव्हा गुलाल उधळत ढोल-ताशांच्या गजरात, त्यांच्याही मिरवणुका निघतात. अशा अनेक स्वागतांच्या मिरवणुकीत लेझिमपथकेही आवर्जून असतात. अध्यात्म, समाजकारण, कला आणि क्रीडा यांचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवातही, आपण हे अनुभवत असतो. गणेशोत्सवात पूजाअर्चादि धार्मिक विधींबरोबर कीर्तने, प्रवचने, व्याख्याने इ. सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम, तसेच मेळे, भावगीते, नकला, जादूचे प्रयोग असे मनोरंजनाचे कार्यक्रमही आढळतात. गणेशोत्सव म्हटले की बुद्धीचे दैवत असणारा गणपती आपल्यावर प्रसन्न असावा, म्हणून अनेक स्पर्धा अथवा पठणांचे आयोजन होत असते. पहिलीत शिकणार्या विद्यार्थी-विद्यार्थिनींपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंतच्या सगळ्या स्त्री-पुरुषांसाठी, अनेक ठिकाणी अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. गणेशोत्सवातील स्पर्धांमधून विजेत्यांना बक्षीसही ठेवले जाते. असा हा काळ गजाननमय झालेला असतो.
गणेशोत्सवासारख्या धार्मिक व सार्वजनिक मिरवणुका, ग्रामीण देवदेवतांच्या पालख्या, खेड्यातल्या जत्रा, उरूस यांच्यापुढे लेझीम खेळणारे ताफे, अनेक ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. एक व्यायामप्रकार म्हणून, शालेय शारीरिक शिक्षणात त्याचा अंतर्भाव आजकाल करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा असोत, अथवा लेझीमपथकांचे नेत्रदीपक सादरीकरण असो, त्या सगळ्यात सादर होणारे ‘हलगी’च्या तालावरचे, शिटी अन् हाताच्या इशार्यावर होणारी हालचाल पाहिली की, लेझीमचा हा खेळ सगळ्यांना गुंगून टाकतो.त्यांच्यातील काहीजणांचा साथ देणार्या ढोल-ताशांच्या पथकात सहभाग असतो. असे हे लेझीम वातावरणात उत्साह निर्माण करत असते.
व्यायाम व मनोरंजन अशा दोन्ही उद्दिष्टांनी लेझीम खेळले जाते. ‘लेझम’ या मूळ फारसी शब्दावरून लेझीम शब्द प्रचारात आला असावा, असा उल्लेख मराठी विश्वकोशात आढळतो. त्याचा मूळ अर्थ तार लावलेले धनुष्य असा आहे. मूळ अर्थ बाजूला राहून आता, लेझीमचा आकार व वजन यांत बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळी सुमारे 21/2 हात लांब बांबू (वेळू) घेऊन, त्याला दोन हात लांब लोखंडी साखळी धनुष्यासारखी लावून हे लेझीम तयार करीत. बांबूचा लवचिकपणा कमी होऊ नये, म्हणून साखळी अडकविण्यासाठी बांबूला आकडे लावीत असत, आणि व्यायाम करतानाच साखळी अकडवीत असत. धनुष्यासारख्या या बांबूचा मध्यभाग जाड करीत. व्यायामासाठी वापरावयाच्या जड लेझीमची तार जाड आणि वजनदार असे. लेझीमचे निरनिराळे हात करून, ही मेहनत केली म्हणजे, हातात चांगली ताकद येत असे. हा खेळ खास महाराष्ट्रीय असून, पेशवाईच्या पूर्वकाळापासून तो रुढ आहे. गुजरातमध्येही तो खेळला जातो. हल्लीचे लेझीम आता वेगळ्या स्वरुपात जरी दिसत असले तरी, त्याच्या उपयोगात काही फरक आढळत नाही.
लेझीमचा खेळ हा पौरुषयुक्त वीरनृत्याचाही प्रकार आहे. त्यात विविध प्रकारचे नर्तकांचे शारीररचनाबंध आढळून येतात. नर्तकसमूहांनी लेझीम वाजवत गोलाकार फेर धरून नाचणे, वेगवेगळी उलटसुलट वर्तुळे रचीत, पुन्हा गिरकी घेऊन पूर्वपदावर येणे, दोन-चारच्या रांगा करून संचलन करणे, इत्यादी. या सर्व हालचालींमध्ये एक प्रकारची सहजता व डौल प्रत्ययास येतो. या समूहनृत्यांत नर्तकांच्या हालचाली व पदन्यास यांचे खूपच वैविध्य दिसून येते. उड्या मारणे, उकिडवे बसणे, वाकणे, पाऊले तालासुरात मागेपुढे लेझीममधील एक रचनाबंध करीत, लयबद्ध रीतीने मागेपुढे सरकणे इ. अनेक नृत्यमय हालचालींचा त्यात समावेश होतो. लेझीम तालासुरात वाजवण्याच्या क्रियेत, नर्तकाचे दोन्ही हात गुंतलेले असल्याने, हातांच्या हालचाली नियंत्रित होतात. लेझीम नृत्याची प्रत्येक हालचाल लेझीमच्या ठेक्याशी व नादलयीशी सुसंगतरित्या केली जाते. सर्व नर्तकांच्या हालचाली तालबद्ध व एकसमयावच्छेदेकरून होत असल्याने, त्यात आकर्षकता निर्माण होते. बुद्धीबरोबर नृत्यकलेचीदेखील देवता असणार्या गजाननाला आपण शरण गेलो, तर तो आपल्यात मानसिक व शारीरिक क्षमता वृद्धिंगत करतोच करतो.
अशा या लेझीमचे नृत्याविष्कार दि. 26 जानेवारीला राजपथावर युवक सादर करत आले आहेत. तर अनेकांना आठवत असेल की, 1982 साली दिल्ली इथे झालेल्या नवव्या एशियाडमध्ये, महाराष्ट्राने आपल्या प्रांताचे प्रतीक म्हणून, 400 खेळाडूंचे लेझीमचे सर्वोत्तम प्रात्यक्षिक दिले होते. 2014 मध्ये सांगलीतील तब्बल 7 हजार, 338 लोकांनी, एकाचवेळी लेझीमचे सादरीकरण केले होते. याची नोंद गिनीज बुकमध्ये केली आहे.
शेगावच्या गजाननाची मिरवणूक, टिळकांच्या काळातील गणेशोत्सवातील गणेशविसर्जनाची मिरवणूक, या मिरवणुकींची आणि सध्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या समारोपाची मिरवणूक यातील आजच्या मिरवणुकीला नवे वळण लावणे आवश्यक वाटू लागले आहे. मिरवणुकीत आधीसारखे शारीरिक खेळांचे सादरीकरण क्वचित दिसू लागले आहे. लेझीम तसेच, शिवकालीन लाठी, ढाल-तलवार, दांडपट्टा, विटा, गुर्ज, कट्यार, फरी गदका, लाठी-बोथाटी असे खेळ खेळत चालणार्या, गणेशविसर्जनाच्या मिरवणुका कमी होऊ लागल्या आहेत. नाही म्हणायला ढोलवादनाला मागणी असल्याने, हलगी तग धरुन असावी, अन्यथा लेझीमला साथ देणार्या हलगीच्या तालाची तालबद्धता कमी होत, त्याऐवजी डिजेचे ताल, आता बेताल होऊ लागले आहेत. ज्या दिवशी दीड दिवसाचे बाप्पा आपल्या घरी जात आहेत, अशा दोन्ही गजाननांना आपण समस्त क्रिडाभोक्ते येथे साकडे घालत म्हणू की, या अशा बेताल अतिउत्साही भक्तांना योग्य ती सुबुद्धी प्रदान करा हो..
॥जयजयाजी गजानना॥
इति!
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704