परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच अव्वल! ३ लाख कोटींची गुंतवणूक आणून दाखवली!

देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सादर केला प्रगतीचा आलेख

    08-Sep-2024
Total Views |

fadnavis
 
मुंबई, दि.६ : प्रतिनिधी : राज्यातील गुंतवणूक आणि मोठे प्रकल्प महायुती सरकारच्या काळात इतर राज्यात जात असल्याच्या विरोधकांच्या टीकेला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट आकडेवारी देत प्रत्युत्तर दिले आहे. 'देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. आम्ही अडीच वर्षात पाच वर्षांचे काम करून दाखवू, असे सांगितले होते. आता आम्ही सव्वा दोन वर्षांत ३,१४,३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक आणून दाखविली आहे,' असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील सर्व राज्यातील परकीय गुंतवणुकीचा आलेख सादर केला. यामध्ये त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक याचीही आकडेवारी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातमध्ये जात असल्याची टीका केली जाते. तसेच, महाविकास आघाडीच्या काळातील उद्योगही महायुती सरकारच्या काळात इतर राज्यात गेल्याची टीका केली जात आहे. मात्र, विरोधकांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
 
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बाब आहे की, महाराष्ट्राने थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. यावर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आली आहे. राज्यात २०१४ ते २०१९ या काळात सत्तेत असताना महाराष्ट्र परकीय गुंतवणूक पहिल्या क्रमांकावर आली होती. मात्र, नंतर गुजरात आणि कर्नाटक पुढे गेले. जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा पहिल्याच मुलाखतीत मी शब्द दिला की परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणणार आहोत. ते आम्ही करून दाखवलं आहे."
 
हा महाराष्ट्र द्रोह नाही ? फडणवीसांचा काँग्रेसला प्रश्न
 
"जे लोक महाराष्ट्रातून गुंतवणूक बाहेर जात आहे असे नेरेटिव्ह तयार करू पाहात होते. त्यांना या आकडेवारीने चपराक बसली आहे. वडेट्टीवार आणि काँग्रेसला गुजरातचेच गुणगान गाण्यात रस आहे. जे राज्यात आपल्या राज्यापेक्षा कित्येक पटीने मागे आहे असे राज्य आपल्या पुढे आहे असं म्हणणं हा महाराष्ट्र द्रोह नाही का? सरकार कोणाचेही असो आपलं राज्य पुढे गेलं याचा आनंद त्यांनी मानायला हवा," असे म्हणत फडणवीसांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.