‘जल संचय जन भागीदारी’ योजनेस पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ
08-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली, दि. ६ : विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातमधील सुरत येथे ‘जल संचय जन भागीदारी’ उपक्रमाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमांतर्गत पावसाच्या पाण्याचा संचय वाढविण्यासाठी आणि दीर्घकाळ पाण्याची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी राज्यभरात अंदाजे २४,८०० रेनवॉटर हार्वेस्टिंग, अर्थात पावसाचे पाणी साठवणाऱ्या संरचना बांधल्या जाणार आहेत.
जलसंधारण हे केवळ धोरण नसून, तो एक प्रयत्न आहे आणि सत्कर्मही आहे, त्यामध्ये औदार्य आहे आणि जबाबदाऱ्याही आहेत. पाणी हा पहिला निकष असेल, ज्याच्या आधारावर आपल्या भावी पिढ्या आपले मूल्यमापन करतील. पाणी हे केवळ साधन नसून जीवनाचा आणि मानवतेच्या भवितव्याचा प्रश्न होता. त्यामुळे शाश्वत भवितव्याच्या दिशेने ठरवण्यात आलेल्या उद्दिष्टांमध्ये जलसंधारण हा अग्रक्रमाने आहे. जलसंधारणाच्या अर्थपूर्ण प्रयत्नांमध्ये लोकसहभाग वाढत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
जलशक्ती अभियान हे आज कसे एक राष्ट्रीय मिशन बनले आहे यावर प्रकाश टाकून पंतप्रधान म्हणाले की, "पारंपारिक जलस्रोतांचे नूतनीकरण असो किंवा नवीन संरचनांचे बांधकाम असो, सर्व स्तरातील व्यक्ती, म्हणजे भागधारकांपासून नागरी समाजापर्यंत आणि पंचायतीपर्यंतच्या व्यक्तींचा त्यात सहभाग आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात प्रत्येक जिल्ह्यात अमृत सरोवराचे काम सुरू झाले आणि त्यामुळे आज देशात ६० हजारांहून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती झाली आहे. त्याचप्रमाणे, अटल भूजल योजनेतही भूजल पुनर्भरणासाठी जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे," असेही ते म्हणाले.