"बदल घडवून आणण्यासाठी सिनेमा हे प्रभावी माध्यम" संस्कार भारती आयोजित कार्यक्रमात निर्माते बोनी कपूर यांचे उद्गार

    06-Sep-2024
Total Views |
cinetalkies
 
मुंबई - सिनेमाच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र आणू शकतो आणि त्यांच्यापर्यंत चांगले विचार, सामाजिक संदेश पोहचवू शकतो हे दाखवून देण्यासाठी 'सिनेटॉकीज' हा उपक्रम खूप महत्वाचा आहे असे विधान प्रसिध्द चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी 'सिनेटॉकीज' परिषदेच्या पोस्टर आणि संकेतस्थळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात केले. संस्कार भारती तर्फे सिनेमावर चर्चा करण्यासाठी आणि सिनेमाच्या माध्यमातून बदल घडवून आणण्यासाठी सिनेसृष्टीतील दिग्गज, सिनेमाक्षेत्रातील विद्यार्थी आणि सिनेरसिक यांची 'सिनेटॉकीज' परिषद १३, १४ आणि १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे पोस्टर आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि. ५ सप्टेंबर रोजी अंधेरी मधील वर्सोवा येथील 'भाग्य बंगल्यात' करण्यात आले होते. निर्माते बोनी कपूर या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले "सिनेमाचा लोकांवर खूप मोठा प्रभाव पडतो. कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर सिनेमा हे खूप प्रभावी माध्यम आहे." या कार्यक्रमाला संस्कार भारतीचे भारतीय चित्र साधनाचे विश्वस्त प्रमोद बापट, कोकण प्रांताचे संघटन मंत्री उदय शेवडे, संस्कार भारतीचे उपाध्यक्ष अरूण शेखर आणि प्रसिद्ध निर्माते अनिल सिंग उपस्थित होते. बोनी कपूर यांच्या हस्ते पोस्टर आणि संकेतस्थळाचे उद्घाटन या कार्यक्रमात झाले. डिसेंबर महिन्यात होणार्‍या सिनेटॉकीज परिषद गोरेगावमधील फिल्म सिटी मध्ये होईल आणि प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि निर्माते सुनिल बर्वे या परिषदेचे संयोजक असतील असे या कार्यक्रमात जाहिर करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरूण शेखर यांनी केले तर उदय शेवडे यांनी या कार्यक्रमात आभार प्रदर्शन केले.