"पॅरा तिरंदाजीत एक अतिशय खास सुवर्ण!"; हरविंदर सिंगच्या कामगिरीवर पंतप्रधानांचे गौरवोद्गार

पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा हरविंदर सिंग पहिला भारतीय पॅरा तिरंदाज

    05-Sep-2024
Total Views |
para archery harvinder singh won gold medal


नवी दिल्ली :     पॅरा आलिम्पिक खेळाडू हरविंदर सिंगने पॅरिस पॅरा आलिम्पिकच्या इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरात कोरले आहे. येथील पॅरा तिरंदाजीत पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपनच्या अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा ६-० असा सरळसेटमध्ये पराभव करून सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज ठरला आहे. हरविंदरच्या सुवर्णपदकासह भारताच्या पदकांची संख्या आता २२ झाली असून यात ४ सुवर्ण, ७ रौप्य आणि ११ कांस्य पदकांचा समावेश आहे.


दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन -
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा


अंतिम सेटमध्ये २९-२५ असा निर्णायक विजय मिळवित सिंगने भारतासाठी चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. अर्थशास्त्रात पीएचडी ते पॅरा आलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करत देशासाठी एक महत्त्वाची कामगिरी हरविंदर सिंगने बजावली आहे. दरम्यान, सिंगने याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला होता. त्यावेळेस हरविंदर याने तिरंदाजी क्रीडाप्रकारात पहिल्यांदाच कांस्यपदक जिंकले होते.


असा राहिलाय हरविंदरचा आजवरचा प्रवास

हरियाणातील अजित नगर येथील शेतकरी कुटुंबातील हरविंदर हा दीड वर्षांचा असताना डेंग्यूने ग्रस्त होता. डेंग्यूच्या उपाचाराकरिता त्याला इंजेक्शन देण्यात आले होते. दुर्दैवाने, या इंजेक्शन्सच्या दुष्परिणामांमुळे त्याच्या पायातील गतिशीलता कमी झाली. या सर्व आव्हानांचा सामना करत हरविंदरने तिरंदाजी केली. आणि २०१७ पॅरा तिरंदाजी जागतिक स्पर्धेत पदार्पण करताना सातवे स्थान मिळविले.

२०१८ च्या जकार्ता आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकत यश मिळविले. कोविड-१९ साथीमुळे लॉकडाऊन दरम्यान त्याच्या प्रशिक्षणाकरिता वडिलांनी आपल्या शेताला तिरंदाजीच्या श्रेणीत रूपांतरित केले. त्यानंतर हरविंदरने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. यशाबरोबरच देशाकरिता पहिलेच पदक त्याच्या नावावर झाले. धनुर्विद्यामध्ये यश मिळवण्याबरोबरच तो अर्थशास्त्रात पीएचडी पदवीही संपादित करत होता.


पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कामगिरीबद्दल अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पॅरा तिरंदाज हरविंदर सिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. हरविंदर सिंगची अचूकता, एकाग्रता आणि अविचल वृत्ती अधोरेखित करत त्याच्या असाधारण कामगिरीचे कौतुक करत "पॅरा तिरंदाजीत एक अतिशय खास सुवर्ण!" अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे.