नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर असून येथील सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी एईएमला भेट दिली आहे. या भेटीत सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यासमवेत दिलेल्या भेटीत जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीतील एईएम ची भूमिका, कार्य आणि भारतासाठीच्या योजना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन -
दरम्यान, सिंगापूर सेमीकंडक्टर उद्योग संघटनेने सिंगापूरमधील सेमीकंडक्टर परिसंस्थेचा विकास आणि भारताबरोबर सहकार्याच्या संधी याविषयी थोडक्यात माहिती दिली असून या क्षेत्रातील सिंगापूरमधील अन्य विविध कंपन्यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे ग्रेटर नोएडा येथे दि. ११ ते १३ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या सेमिकॉन इंडिया प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सिंगापूरच्या सेमीकंडक्टर कंपन्यांना आमंत्रित केले आहे.
देशात सेमीकंडक्टर उत्पादन व्यवस्था विकसित करण्याचे भारताचे प्रयत्न आणि या क्षेत्रातील सिंगापूरची ताकद लक्षात घेता उभय देशांनी द्विपक्षीय सहकार्य आणखी विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या बैठकीदरम्यान द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी एक आधारस्तंभ म्हणून सेमीकंडक्टर्सवर लक्ष केंद्रित करून प्रगत निर्मिती करण्यास सहमती झाली आहे.
भारत-सिंगापूर सेमीकंडक्टर परिसंस्था भागीदारीबाबत सामंजस्य करारही केला असून एईएम येथे दोन्ही पंतप्रधानांनी सिंगापूरमध्ये प्रशिक्षण घेत असलेले जागतिक कौशल्य केंद्रातील भारतीय प्रशिक्षणार्थी तसेच सीआयआय -एंटरप्राइझ सिंगापूर इंडिया रेडी टॅलेंट कार्यक्रम अंतर्गत भारताला भेट दिलेल्या सिंगापूरच्या इंटर्नशी आणि एईएम मध्ये काम करणाऱ्या भारतीय अभियंत्यांशी संवाद साधला आहे. या भेटीत सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान वाँग यांचे आभार मानले.