मुंबई : मुख्यमंत्री कोण होणार हे जनताच ठरवेल, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी केले आहे. बुधवारी शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं होतं. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आताच ठरवण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, जनतेच्या मनात जो चेहरा आहे त्यालाच जनता मुख्यमंत्री बनवेल. शरद पवारांचं म्हणणं ठीक आहे. महाविकास आघाडीचं तीन पक्षांचं सरकार असेल. कोण किती जागा जिंकणार यावरून नंतर ठरवलं जाईल. परंतू, महाविकास आघाडीला बहुमत मिळेल," असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सध्या एकमेकांच्या विरोधात मतं येत आहेत. निवडणूकीआधीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी उबाठा गटाची मागणी आहे. तर निवडणूकीनंतर ज्याच्या जास्त जागा येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल अशी भूमिका काँग्रेस आणि शरद पवार गटाने घेतली आहे.