विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढू नका अन्यथा…; पोलिसांचे आदेश!
05-Sep-2024
Total Views |
मुंबई : सर्वांच्या लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असून सर्व भाविक गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. अगदी पूजा-प्रसाद सामग्री आणण्यापासून ते मखर सजावटीपर्यंत सर्व कामांची लगबग आता सुरू झालेली दिसत आहे. लवकरच "गणपती बाप्पा मोरया" या जयघोषात आपले लाडके बाप्पा विराजमान होतील. मात्र या उत्सवासंदर्भात पोलिसांनी नागरिकांना काही महत्वाचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवाचा सण निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी काही निर्देश जारी करण्यात आले आहेत.
दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन
गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यानंतर फोटो काढू नका, असे आदेश पोलिसांनी दिले आहेत. जर विसर्जन झाल्यावर अशाप्रकारे गणरायाच्या मूर्तीचे फोटो काढून प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हे महत्वाचे आदेश दिले आहेत.
हे वाचलंत का? - गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
यंदाच्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी गणेशाचे आगमन होणार आहे. त्यापुढे दीड दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत विविध दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात येते. ८, ११, १२, १३ आणि १७ सप्टेंबर यांदिवशी गणपती विसर्जन होणार आहे. विसर्जनानंतर काही अर्ध्या विरघळलेल्या मूर्ती तसेच मूर्तीपासून वेगळे झालेले भाग हे भरतीच्या वेळी किनाऱ्यावर वाहून येतात किंवा पाण्यावर तरंगतात. काही जण या तरंगणाऱ्या मूर्तीचे फोटो काढून प्रसारित अथवा प्रकाशित करतात ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची तसेच सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते.
ह्या प्रतिबंध घालण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच कलम १६३ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ अन्वये त्वरीत प्रतिबंधासाठी जलद उपाय करणे इष्ट आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी आदेश दिले आहेत. कोणत्याही व्यक्तीने विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढू नयेत अथवा ते प्रसारित करू नयेत, असे त्यात नमूद करण्यात आले आहेत. दि. ०८ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत हा आदेश लागू राहील. तसेच या आदेशाचे उल्लंघ केल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, दंडही ठोठावला जाऊ शकतो.