मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

१ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचे वाटप

    05-Sep-2024
Total Views |

ladki bahin yojana
 
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटी द्धारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे.
 
या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दीष्ट आहे त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
 
नवी मुंबई येथे अर्ज भरतांना केलेल्या गैरप्रकारासाठी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्याची माहिती यावेळी देण्यात आली.
 
लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत
 
शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही. या लेखाशिर्षात पुरेशी तरतूद उपलब्ध आहे. तथापि जेव्हा तरतूद नसते, तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते. मात्र, पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने ही उणे तरतूद वापरण्याची गरज नाही एवढाच त्या आदेशाचा अर्थ आहे. याबाबतीत स्वयंस्पष्ट आदेश जारी करण्यात आला आहे असे मदत व पुनर्वसन विभागाने आज मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट केले.