चंद्रपूर : काँग्रेसने तिकीट नाकारलं तरी मी विधानसभा निवडणूक लढवणारच, असा सूचक इशारा खासदार प्रतिभा धानोरकरांचे दिर अनिल धानोरकरांनी दिला आहे. तसेच मी माजे सर्व पर्याय खुले केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी गुरुवारी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
अनिल धानोरकर म्हणाले की, "भद्रावतीमध्ये मी विविध कामं केली आहेत. मी केलेल्या कामाचा बाळूभाऊंना आणि आमच्या संपूर्ण परिवाराला फायदा झाला. काँग्रेसने अद्याप वरोरा विधानसभेचा उमेदवार निश्चित केलेला नाही. पण खासदार प्रतिभा धानोरकर या त्यांचे बंधू प्रवीण काकडेंचं नाव समोर करत असल्याचे त्यांनी सांगितले. तो माझ्या रणनितीचा भाग असल्याचे त्यांनी मला म्हटले होते. परंतू, जसजसे दिवस पुढे जात आहेत तसं त्यांना प्रमोट करण्याचं काम सुरु आहे. प्रवीण काकडेंना तिकीट मिळेल अशी सर्वत्र चर्चा आहे."
हे वाचलंत का? - उद्धव ठाकरेंची अवस्था ना घर का ना घाट का! भाजपची जोरदार टीका
"परंतू, मीसुद्धा काँग्रेसकडे तिकीट मागितले आहे. तसेच काँग्रेसने केलेल्या सर्व्हेमध्येही मीच पुढे आहे. सर्व्हेनुसार निर्णय घेण्यात येईल असं मला काँग्रेस नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे मलाच उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. काँग्रेसने मला उमेदवारी दिली नाही तरीसुद्धा मी उभा राहणार आहे. मी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. काही पक्ष आणि इतरही लोकं माझ्या संपर्कात असून मी शंभर टक्के ही निवडणूक लढणार आहे," असे ते म्हणाले.
वरोरा विधानसभेसाठी प्रतिभा धानोरकर त्यांचे भाऊ प्रविण काकडेंना तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. तर त्यांचे दिर अनिल धानोरकरसुद्धा विधानसभा लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे आता धानोरकर कुटुंबात संघर्ष होणार का? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित करण्यात येत आहे.