समाजात स्वप्नपेरणी करणारा शिक्षक...

    04-Sep-2024
Total Views |
teacher day teaching profession
 

‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या ओळी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला अधिक विशद करणार्‍या आहेत. शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ असतो. वर्तमान आणि भविष्य यावर अंमल ठेवण्याची ताकद शिक्षकी पेश्यात आहे. शिक्षक आज जे पेरणार आहेत, तेच उद्याचे भविष्य म्हणून प्रकाशणार आहे. आणि भविष्य निर्माण करण्याची ही क्षमताच शिक्षकी पेश्याला इतर कोणत्याही पेशापेक्षा वेगळेपणा मिळवून देत असते. याच गुणांमु़ळे आणि योगदानामुळे शिक्षक दिन आजवर साजरा होत आहे. त्यानिमित्ताने शिक्षकी पेशाची महती वर्णन करणारा हा लेख

दि. 5 सप्टेंबर हा देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी समाज आणि शासन व्यवस्था शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करते, खरे तर हा शिक्षकी पेशाचा सन्मान आहे. समाजात विविध व्यवसाय व पेशांची माणसे कार्यरत असताना शिक्षकी पेशाचाच इतका सन्मान का केला जातो, असा प्रश्न कोणालाही पडेल. खरे तर शिक्षकाची नोकरी म्हणजे काही सरकारी नोकरी नाही, तर तो राष्ट्र आणि समाजनिर्मितीचा पेशा आहे. शिक्षक, वर्गाच्या चार भिंतींच्या आत जे काही पेरत असतो, त्यावर समाज व राष्ट्रविकासाची प्रक्रिया गतिमान होणे अवलंबून असते.शिक्षक करत असलेल्या विचारपेरणीची शक्ती मोठी आहे. त्या शक्तीची जाणीव अनेक राजामहाराजांना झाल्याचा इतिहास आहे. शिक्षकांच्या शक्तीवर अनेक साम्राज्ये उभी राहिली आहेत. त्याप्रमाणेच शिक्षकांनी ठरवल्यानंतर अनेक साम्राज्यांचा अंतदेखील झाला आहे. त्यामुळे त्या दिशेचा प्रवास घडवण्यासाठी अऩेकांनी आपले समग्र जीवन व्यतीत केले आहे. त्यातून अखंड जीवन ज्ञानसाधना करत त्यांनी, समाजाला उभे करण्याचे काम केले आहे.

मुळात अशाच शिक्षकांमुळे समाज घडत असतो. असे शिक्षक वर्तमानातही आहेत. त्यामुळे जीवनभर ज्ञानसाधना करणारे आणि ज्ञानदानाची वाट चालणारे शिक्षक म्हणजेच परंपरेचा सन्मान आहे. अशाच शिक्षकांना समाज सन्मान देत आला आहे. ज्ञानसाधक असलेल्या शिक्षकांना सन्मान मिळाला नाही, असे घडत नाही. समाज नेहमीच चांगल्या वाटेने जाणार्‍यांप्रति आदर, सन्मान व्यक्त करत आला आहे. त्यामुळे त्या वाटा इतिहासाप्रमाणे वर्तमानातदेखील चालाव्या लागणार आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घालून दिलेल्या वाटांचा प्रवास शिक्षक करतील, तर समाज त्यांच्याप्रतिही कायम कृतज्ञताच व्यक्त करेल, यात शंका नाही. आज होत असलेला सन्मान त्याच वाटेचा आहे.

सर्वपल्ली राधाकृष्णन हे जगातील अनेक विद्वानांपैकी एक मानले जातात. ते भारतीय तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. भारताकडे जेव्हा केवळ चमत्कार म्हणून पाहिले जात होते, तेव्हा राधाकृष्णन यांनी भारतीय तत्वज्ञानाची खोली आणि उंची जगाला दाखवून दिली होती. त्यांचा व्यासंग प्रचंड होता. त्यांच्या त्या व्यासंगाने आणि ज्ञानाच्या जोरावरच त्यांना राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचता आले. त्या काळातही त्यांना मिळालेला सन्मान हा केवळ राष्ट्रपतिपदावर आहेत म्हणून लाभलेला नव्हता, तर त्यांच्या ज्ञानसाधनेचा तो सन्मान होता. ते ज्ञानसाधक होते, म्हणूनच त्यांना त्या पदापर्यंत गरूडझेप घेता आली. त्यांना त्या काळात जगातील अऩेक नामंवत विद्यापीठांमध्ये, सन्मानाने निमंत्रित केले जात होते. जग त्यांची ज्ञानसाधना पाहून तोंडात बोटे घालत होते. एक विद्वान शिक्षक या देशाला त्यांच्या रूपाने मिळाला. त्यांचा हा प्रवास देशातील तमाम शिक्षकांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. खरे तर एक शिक्षक राष्ट्रपती होतो, यात काय विशेष? असा प्रश्न भगवान रजनीश विचारतात.

कारण, शिक्षक हा ज्ञानाच्या जोरावर उंची प्राप्त करीत असतो. शिक्षकांची असणारी उंची हीच त्या राष्ट्राची उंची असते. त्यामुळे शिक्षकांनी सातत्याने ज्ञानाची साधना करणे, अपेक्षित आहे. शिक्षक ज्या दिवशी आपली ज्ञानाची तहान संपवितो, त्या दिवशी शिक्षकांमधील शिक्षकत्वाचा अंत झाला, असे मानले जाते. शिक्षक जीवंत आहे, याचा पुरावा म्हणजे शिक्षक सातत्याने ज्ञानाची उपासना करत आलेला असतो. त्यामुळे अखंड साधना करत राहणारी व्यक्तीच, स्वतःला शिक्षक म्हणवून घेण्यास पात्र आहे. पदवीने नोकरी करता येते. मात्र, त्यातून शिक्षक म्हणून सेवा बजाविता येणार नाही. त्यामुळे समाजदेखील जे शिक्षक ज्ञानसंपन्न आहेत, त्यांचा आदर करतो. ज्ञानपरायण आणि सेवापरायण हा शिक्षकाचा गुण आहे. आपली सेवा प्रामाणिकपणे आणि समर्पणाच्या वृत्तीने करणारे शिक्षक, कधीच कोणाच्याही चरणांवरती नतमस्तक होत नाहीत. त्यांची मस्तके पुस्तके आणि ज्ञानाच्या जोरावर घडलेली असतात. अशा शिक्षकांना लाचारी हा शब्द स्पर्शही करत नाही. खर्‍या शिक्षकांची गरज गुणवत्ता हीच असते. नवनवीन ज्ञानाची प्राप्ती ही त्यांची भूक असते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात, जिज्ञासा आणि अखंड शिक्षणाची तहान निर्माण करणे महत्त्वाचे असते. आपल्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान आणि प्रभावी अध्यापन, हा प्रवास त्यांना सतत खुणावत असतो. आपल्या कामावर त्यांची निष्ठा असते. त्या निष्ठेसोबत पेशावरती असणारे प्रेमही उल्लेखनीय म्हणायवा हवे. पुरस्काराच्या मागे लागणे त्यांना ठाऊक नसते. पुरस्कार त्यांच्या मागे चालत येतात. ही माणसे पुरस्काराने कधीही हवेत उंचावत नाहीत आणि पुरस्कार मिळाला नाही, म्हणून कधी निराशही होत नाहीत. केवळ काम करीत राहणे, हाच त्यांचा अखंड जीवनप्रवास आहे. त्यांचा प्रवास निखळ आनंदाचा असतो. या प्रवासात स्वतःच्या स्वार्थाचे दर्शन नाही, आणि केलेल्या कामाचे प्रदर्शनदेखील घडत नाही. ही माणसे आपल्या कामावर निष्ठा ठेवत चालत राहतात, आणि त्यांच्यावर समाज व राष्ट्रविकासाची दिशा अवलंबून असते. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणारी माणसे, हेच आकाशाचे खांब असतात. खरे शिक्षक जीवनभर साधना करत राहतील, तर आकाश कधीच कोसळणार नाही. एकदा एक व्यक्ती आकाशाकडे पाहत विचार करीत होती. विचार करता करता त्याला आकाश कोसळण्याची भीती वाटू लागली. त्याच्या मनातील भीती आणि चिंतेने तो वेडा झाला. तो पळत घराच्या बाहेर आला.

घरातील मंडळींनादेखील बाहेर बोलावून त्यांना देखील ओरडून सांगू लागला. ‘आकाश केव्हावी कोसळेल, त्याला खांबच नाही आहेत, पळा, पटकन पळा,’ असे तो सगळ्यांना सांगतो आणि तो धावत सुटतो. अखेर त्याचे कोणी ऐकत नाही आणि तो एकटाच पळतो आणि शेवटी थकतो. स्वतःला वाचवण्यासाठी तो गावातील नदीच्या काठावर जाऊन पाण्यात डुंबू लागतो. तेव्हा काठावर एक साधू महाराज बसलेले असतात. ते त्या माणसाचे बडबडणे ऐकतात. त्याच्या बडबडीचे नेमके काय कारण आहे हे लक्षात घेतात. जवळ बोलवतात आणि त्याला सांगतात की, आकाशाला खांब नाहीत हे खरे वाटत असेल, पण आकाश खांबाशिवाय कसे काय टिकेल? आकाशाला खांब आहेत, पण दिसत नाहीत, इतकेच. मग तो धावत सुटलेला माणूस म्हणतो, मग खांब कोठे आहे? तेव्हा साधू महाराज म्हणतात की, समाजात प्रामाणिकपणे, समर्पणाने, कोणत्याही स्वार्थाशिवाय जी माणसे केवळ सद्विचाराच्या वाटेने चालत राहतात, ती माणसे म्हणजे आकाशाचे खांब आहेत. ती दिसत नाही पण आकाशाचे खांब असतात, हे मात्र निश्चित. त्यामुळे शिक्षकांप्रति इतिहासापासून तर वर्तमानापर्यंत सर्व व्यवस्थाच सन्मान देत आली आहे. शिक्षक हेच आकाशाचे खांब आहेत. ते जोवर आपल्या वाटा चालत राहतील, तोवर कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही.

शिक्षक हा समाज व राष्ट्राचा निर्माता मानला जातो. याचे कारण तो केवळ चार भिंतीच्या आत मुलांवर संस्कार करीत नसतो, तर राष्ट्राच्या भविष्यातील जडणघडणीसाठी लागणार्‍या उत्तम मनुष्यबळाच्या मस्तकांची निर्मिती करीत असतो. त्यामुळे प्रत्येक देशातील व्यवस्था अधिक उत्तम राहण्यासाठी आणि समाज समृद्ध होण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत असतात. कोणताही समाज किती समृद्ध आहे, तो किती ज्ञानसाधनेची वाट चालतो, त्यावर राष्ट्र प्रगतीच्या दिशेने पाऊले टाकते. त्यामुळे जगातही शिक्षकांना सन्मान दिला जात असतो. अमेरिकन राष्ट्रप्रमुख बराक ओबामा जेव्हा इजिप्तला भेट देण्यासाठी गेले होते, तेव्हा त्या देशाने त्यांच्या भेटीच्या निमित्ताने एक व्याख्यान आयोजित केले होते. ते व्याख्यान तेथील विद्यापीठात नियोजित होते. त्यासाठी देशातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक, शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते. इतर कोणाही राजकीय व्यक्ती, मंत्री यांना प्रतिबंध करण्यात आला होता. देशाचे भविष्य शिक्षकांच्या हाती असते. ते विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्न पेरतात. त्यामुळे त्यांना जितकी प्रेरक आणि उत्तम दर्जाची व्याख्याने, ज्ञानाचे स्त्रोत उपलब्ध करून दिले जातील, तितका परिणाम वर्गातील विद्यार्थ्यांच्या मनावर अध्यापन करताना होणार आहे, ही जाणीव तेथील राज्यकर्त्यांच्या मनात होती. त्या जाणिवा व्यवस्थेने जोपासल्या, तरच भरारी घेऊन देशाची प्रगती साधली जाते.

शिक्षकांना समृद्ध करीत जाणे, आणि त्यांच्याद्वारे समाजाला दिशा दाखवणे सतत घडायला हवे. शिक्षकांनीदेखील जीवनभर शिकण्याचा प्रवास घडवण्यासाठी तयारी दाखवायला हवी. शिक्षक म्हणून आपण स्वतःला जितके समृद्ध करीत जाऊ, तितका शिक्षकांचा सन्मान उंचावत जाणार आहे. समाजाला शिक्षक हा नोकर वाटता कामा नये. ज्या दिवशी शिक्षक हा सरकारी नोकर वाटू लागेल, त्या दिवशी समाजाच्या मनातील परिवर्तनाच्या अपेक्षा मेलेल्या असतील. शिक्षकांने स्वातंत्र्य उपभोगत, समाज व राष्ट्राचे उत्थान घडविण्यासाठी पाऊलवाटा निर्माण करण्याची हिंमत दाखवायला हवी. परिवर्तनाच्या पाऊलवाटा चालणे कठीण असते. परिवर्तन हे व्यवस्थेला धक्का देणारे असते. त्यामुळे ते अनेकांना नकोच असते. मात्र त्या वाटा चालल्याशिवाय शिक्षकांचे स्थान अधोरेखित होणार नाही. त्यामुळे शिक्षकांनी मनात विचारांची मशाल पेटवत परिवर्तनासाठी संघर्षाची हिंमत कमवायला हवी. त्यात सर्वांचे हित आहे.

शिक्षकांच्या विचारांत मात्र सातत्याने निरपेक्षता आणि समाज, राष्ट्रहित अधोरेखित व्हायला हवे. म्हणजे इतिहासात शिक्षकांवर दिसणारा विश्वास प्राप्त करता येईल. शिक्षक कोणत्या दिशेने प्रवास करणार आहे, हेच नेहमी लक्षात घ्यायला हवे. वर्तमानात शिक्षक दिन साजरा होत असताना, शिक्षकांप्रति समाजाने कृतज्ञता व्यक्त करायला हवीच. पण तसे घडले नाही, तर शिक्षकांचे फार नुकसान नाही; पण समाजाचे मात्र नुकसान अधिक आहे. शेवटी स्वप्ने पेरणारा थांबला की, भविष्याच्या दिशेने पाऊले पडणे अपोआपच थांबते. तो प्रवास थांबला तर प्रगतीचा आलेख उंचावण्याची शक्यताच नाही. म्हणून शिक्षक स्वप्न पेरणारा आहे. त्यासाठीच त्याला व्यवस्थेने बळ देण्याची गरज आहे.

संदीप वाकचौरे